विष्णू सानप
पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या २६ तारखेला मतदान होणार असून दोन तारखेला निकाल लागणार आहे.
दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारात कुठलीही कस राहु नये यासाठी प्रचाराची सर्वच कुमक दोन्ही मतदारसंघात पुरवली जात आहे. कसब्यात भाजप आणि महाविकास आघाडीत सरळ लढत होतेय. मात्र, चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपच्या उमेदवार असून महाविकास आघाडीकडून नाना काटे तर शिवसेनेचे (ठाकरे) बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे देखील निवडणूक रिंगणात असल्याने कमालीची चुरस या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
राहुल कलाटे उभे असल्याने मते विभागले जातील आणि त्याचा फायदा अश्विनी जगताप यांना होईल, असे अनेकांना वाटते. मात्र, असे असले तरी नाना काटे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली असून जगताप यांच्यापुढे तगडं आव्हान उभं केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे भाजपकडूनही सावध पवित्रा घेत प्रचारात कुठलीही कसर ठेवली जात नसल्याचे दिसत आहे. यासाठी भाजपच्या अनेक दिग्गज मंडळींच्या सभा आणि रॅली काढण्यात येत आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून फारशा सक्रिय आणि चर्चेत नसलेल्या पंकजा मुंडे यांनाही चिंचवडच्या प्रचारासाठी भाजपला उतरवावे लागलं आहे. याचं कारणही विशेष आहे. कारण पिंपरी आणि चिंचवड परिसरात मराठवाड्यातून कामानिमित्त स्थायिक झालेला मोठा वर्ग आहे. यामध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि अहमदनगर या परिसरातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यातही ओबीसी आणि वंजारी समाजाचे मतदान या मतदारसंघांमध्ये सुमारे ३० हजार असल्यास बोललं जातं. त्यामुळे पंकजा मुंडेंची या मतदारसंघावर एक छाप आहे. नेमकं हेच हेरून पंकजा मुंडेंना चिंचवड मध्ये सभा आणि भेटीगाठी घेण्याच्या सूचना भाजपकडून केल्याचं समजते.
चिंचवडमध्ये तिरंगी लढत जरी होत असली तरी खरा सामना नाना काटे आणि अश्विनी जगताप यांच्यातच होणार, असं अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना जवळपास ३० ते ३५ हजार मताचाच लीड होता. त्यामुळे पंकजा मुंडेंचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात त्यांनी ताकतीने प्रचार केला तर जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या पक्षावर नाराज आहेत. हे काही लपून राहिलेले नाही. याबाबत त्यांच्या समर्थकांनी वारंवार उघडपणे नाराजी बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मताच्या रूपाने नाराजी व्यक्त केली तर भाजपची अडचण देखील ठरू शकते.
दरम्यान, पंकजा यांचा या मतदारसंघावरील प्रभाव कमी करण्यासाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील काल प्रचारासाठी बोलवण्यात आले होते. तर या पोटनिवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहत असलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करत माझी बहीण म्हणजे पंकजा मुंडे यांना भाजपकडून प्रचारासाठी बोलवण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत भाजप पंकजाताईंना मंत्रीपद देत नाही तोपर्यंत मुंडे साहेबांना मानणाऱ्या नागरिकांनी भाजपला मतदान देऊ नये, अशी भावनिक साद घातली आहे. आता २६ तारखेला मतदान काय करतात आणि कुणाच्या पारड्यात आपली मत टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.