पुणे : चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे राहुल कलाटे (Rahul Kalate) ठरले आहेत. त्यांच्याकडे ४८ कोटी ४१ लाखांची संपत्ती आहे. खेड तालुक्यातील सोळू (Solu) तसेच मुळशी तालुक्यातील नेरे (Nere) येथे त्यांची शेतजमीन आहे. त्यांच्यावर ८ कोटी ४० लाखांचे कर्ज (Loan) देखील आहे. तसेच एक ‘रिव्हॉल्वर’ आहे. राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्ता जाहीर केली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत दिलेल्या शपथ पत्रातून राहुल कलाटे हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्याकडे २ किलो सोन्यासोबतच २३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विट्ठल उर्फ नाना काटे यांच्याकडे एकूण १९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यामध्ये ३५ तोळे सोन्याचा समावेश आहे.
खेड तालुक्यातील सोळू येथे वारसाप्राप्त त्यांची शेतजमीन जमीन आहे. नेरे, मुळशी येथे देखील त्यांची जमीन आहे. रहाटणीत निवासी इमारत आहे. बिगर शेत जमिनीवर बांधकामाच्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूक केली आहे. चालू बाजारभावानुसार त्याची किंमत ४६ कोटी ४८ लाख रुपये इतकी आहे.
पुण्यातील बृहन महाराष्ट्र महाविद्यालयामधून राहुल कलाटे यांचे बी-कॉम पर्यंतचे शिक्षण झाले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँकेत त्यांच्या ठेवी आहेत. तसेच एलआयीसीमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याकडे मर्सीडीज बेन्झ मोटार आहे. पाच लाख २५ हजारांचे १५ तोळे सोने त्यांच्याकडे आहे. तर, ५५ हजार रुपयांची ‘रिव्हॉल्वर’ देखील त्यांच्याकडे आहे. शेती आणि व्यापार उत्पन्नाचे साधन असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने विठ्ठल उर्फ नाना काटे’ यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. राहुल कलाटे यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.