Download App

Nana Patole चीं भाजपवर सडकून टीका… ‘दुसऱ्याची घरं फोडणारांना..’

मुंबई : नाशिकमध्ये काँग्रेसचे (Congress) घर फोडण्याचे पाप भाजपाने (BJP) केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करून नाही, अशी सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली.

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि राजा कोण?’ याचे उत्तर जनतेने दिले आहे.

नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याबद्दल काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.

नाना पटोले म्हणाले, पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. नागपूर हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा बालेकिल्ला आहे पण याच बालेकिल्ल्यात काँग्रेसने मागील वर्षी पदवीधरच्या निवडणुकीत पराभूत केले, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाची धूळ चारली.

विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेस विचाराची राहिली आहे. विदर्भाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करेल. भाजपाने या निवडणुकीत सर्व काही ठरवून केले, सत्तेचा दुरुपयोग केला. जो जिंकला तो आपला अशी भाजपाची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.

नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला. सत्यजित तांबेला उमेदवारी द्या असे त्यांनी सांगितले असते तर आम्ही उमेदवारी दिली असती. डॉ. सुधीर तांबे यांनी फार्म भरताना घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप आहे. नाशिकच्या संदर्भात हायकमांडच निर्णय घेईल, असे नाना पटोले म्हणाले.

Tags

follow us