खडकी, शिवाजीनगर, वाघोली, लोहगावसह विविध भागांत कारवाई; पुण्यात 10 दिवसांत 76 जणांवर गुन्हे दाखल

अनेक घरमालकांनी आपल्या सदनिका, घरे किंवा दुकाने भाड्याने देताना भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात सादर केलेली नव्हती.

Untitled Design   2026 08 05T194219.027

Untitled Design 2026 08 05T194219.027

Crimes against 76 landlords and PG operators in Pune : तुम्ही तुमचे घर, सदनिका, दुकान किंवा ‘पेइंग गेस्ट’ (पीजी) सुविधा भाड्याने दिली असेल, तर संबंधित भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांत तब्बल 76 घरमालक आणि पीजी चालकांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक घरमालकांनी आपल्या सदनिका, घरे किंवा दुकाने भाड्याने देताना भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात सादर केलेली नव्हती.

तसेच काही ठिकाणी पीजी सुविधा चालवणाऱ्या चालकांनीही विद्यार्थी आणि राहणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना दिली नसल्याचे तपासात आढळून आले. यामुळे संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. खडकी, शिवाजीनगर, आंबेगाव आणि वाघोली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत भाडेकरूंची माहिती न सादर करणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर लोहगाव परिसरात पीजी व्यवसाय चालवणाऱ्या तीन चालकांनी त्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पक्षातील बहुमत ठरवण्यासाठी स्पष्ट निकष हवेत; सरन्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टिप्पणी

याशिवाय वारजे, लोणी काळभोर, शिवाजीनगर आणि इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीण प्रशासनानेही या विषयात स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, घरमालकांनी आपल्या घरात किंवा मालमत्तेत भाडेकरू ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे. ही माहिती देणे केवळ औपचारिकता नसून कायदेशीर जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भाडेकरूंची माहिती सादर करताना त्यांचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रांची प्रत अशी आवश्यक कागदपत्रे पोलिसांकडे जमा करावी लागणार आहेत. पोलिसांच्या मते, शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, स्थलांतर आणि भाडेकरूंची वाढती संख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भाडेकरू पडताळणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित व्यक्ती भाड्याच्या घरांमध्ये राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक घरमालकाने भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे आवश्यक करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओच्या वादा दरम्यान मार्क झुकरबर्गने माफी मागितली पण… प्रकरण वेगळच

प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, भाडेकरू किंवा पीजीमधील रहिवाशांची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात न दिल्यास भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 223 अंतर्गत दंडनीय कारवाई करण्यात येईल. त्यामुळे घरमालक, सदनिकाधारक, दुकानदार आणि पीजी चालकांनी नियमांचे पालन करून तातडीने भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागातील घरमालकांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात भाडेकरू पडताळणी मोहिम आणखी तीव्र करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version