Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीर अजूनही फरार आहे. यात वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष होता. त्याचीही पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. या घडामोडींनंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. ‘माझ्या माहितीप्रमाणे वैष्णवी आणि शशांकचं लव्ह मॅरेज होतं. आता मी फक्त त्या लग्नाला उपस्थित राहिलो यात माझी काय चूक?’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ते बारामती येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.
यानंतर अजित पवारांना जाब विचारायला पाहिजे असे काही प्रसारमाध्यमांतून समोर येत होते. याचा उल्लेख स्वतः अजित पवार यांनी केला. या प्रकारवर प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच ‘या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. माझी जी काही बदनामी होत आहे ती थांबली पाहिजे. एखादा माझ्या पक्षाचा सभासद असेल म्हणून त्याने चूक केली तर माझा काय संबंध? मी त्याला चूक करायला सांगतो का? उलट माझ्या जवळच्या कुणी चूक केली तर मी आधी पोलिसांना सांगतो की ह्याला टायरमध्ये घ्या, सोडू नका.’
‘अनेक जण मला लग्नाला बोलावतात. मी शक्य असेल तितकं येण्याचा प्रयत्न करतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो. नंतर त्याने सूनेला काही वेडंवाकडं केलं तर त्यात अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनं सांगितलं होतं का असं करा म्हणून. घटना घडल्यानंतर (वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण) मी लगेचच पिंपरी चिंचवड पोलिसांना सांगितलं होतं की कुणी का असेना अॅक्शन घ्या. आता ज्या मुलीने आत्महत्या केली तिची सासू, नणंद आणि नवरा जेलमध्ये आहेत. सासरा (राजेंद्र हगवणे) पळाला पण पळून पळून कुठं जातोय. पोलिसांनी तीन टीम सोडल्या आहेत. तीन नाही सहा सोडा. मुसक्या बांधूनच त्याला घेऊन या.’
वैष्णवी हगवणेंचं बाळ सुखरूप, वैष्णवीच्या आई-वडिलांकडे करणार सुपूर्द; पडद्यामागे काय घडलं?
‘पण टीव्ही चॅनेलवाले अजित पवार अजित पवार करतात अरे पण माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातली लोकं आहोत. कुणी लग्नाला बोलावलं तर प्रेमापोटी जावं लागतं. नाही गेलं तर माणसं रुसून बसतात. शक्य ते आम्ही करतो पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का की तुम्ही सूनेशी असं वागा म्हणून. मीच लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यास सुरुवात केली. याआधी कुणी केली नव्हती. आम्ही महिलांचा सन्मान करतो. पण चॅनेलवाले खुशाल म्हणतात की याचा अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटकवा. पण उगीचच माझी बदनामी चालवली आहे ती आधी थांबवा.’
‘तो तर (राजेंद्र हगवणे) माझा पदाधिकारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकालपट्टी केली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत. गरीबाच्या दारात दहा वेळा जाईन पण असल्या भडव्यांच्या दारात जाणार नाही. पण कुठंतरी माझी बदनामी करण्याचं काम थांबलं पाहिजे. पोलिसांकडून या प्रकरणात कारवाई सुरू आहे. तीन आरोपी अटक आहेत. वैष्णवीचा सासरा, दीर फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत आणखी तीन पथके वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.’
वैष्णवी हगवणेंचं बाळ आजी-आजोबांकडे, अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी कामगिरी बजावली
‘वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहे. आमच्याकडून जे काही शक्य आहे ते सगळं आम्ही करतोय. तरी देखील चॅनेलवाले अजित पवारांचा अजित पवारांचा पक्ष म्हणत आहेत. आता काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत. यात जर कुणी चूक केली तर यात माझा काय संबंध आहे? मी त्यांना चूक करायला सांगतो का? चूक केली तर माझ्या जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो की ह्याला टायरमध्ये घे’, अशा शब्दांत अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं.