पुणे : शहरात आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील शीतयुद्धाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. कारण आता अजितदादांसंदर्भात शांत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनीही शहरात लक्ष घातले आहे. त्यांनी शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार (14 सप्टेंबर) कोथरूड, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातील विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. शिवाय गणेशोत्सवानंतर क्षेत्रीय स्तरावरही बैठका घेण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. (DCM Ajit Pawar vs Minister Chandrakant Patil on Pune vidhansabha Constituency issue)
शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अद्याप कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुत्रे हातात घेतातच पुण्यात बैठकांचा धडाका सुरु केला. अजित पवारांच्या या धडाक्यामुळे पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाल्याचे दिसून आले होते. यातून त्यांनी अजित पवार यांची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचीही चर्चा होती.
पण आता पाटील यांनीही बैठकांचा धडाका सुरू केला आहे. लष्कर शासकीय विश्रामागृहात त्यांनी कोथरूड, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातील समस्यांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणीपुरठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा वाहतूक, रस्ते, सांडपाणी वाहिन्या सुस्थितीत ठेवण्याचे आदेश पाटील यांनी यावेळी सर्वांना दिले.
पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित पवार हे पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्न याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत होते. पालकमंत्रिपद जरी आपल्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनीही पुणे शहरात लक्ष घालत बैठका घेत विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता दोन्ही दादांमधील शीतयुद्धाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.