संभाजी भिडेंच्या अडचणी वाढणार! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी तुषार गांधी आक्रमक, थेट न्यायालयात केली तक्रार दाखल
पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji bhide) हे कायम बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. त्यांनी सातत्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी (Mahatma Gandhi) अवमानकारक वक्तव्ये केली होती. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमातही त्यांनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी आज न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह विधान करून महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि इतर काही महापुरुषांचा अपमान केला होता. या प्रकरणी तुषार गांधी यांनी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज त्यांनी शिवाजीनगर न्यायालयात संभाजी भिडे, डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वकील असीम सरोदे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव सामंत हे देखील तुषार गांधी यांच्यासोबत आहेत.
ईडीच्या छापेमारीने ‘बॉलिवूड’चे धाबे दणाणले; ‘त्या’ इव्हेंटनंतर दिग्गज कलाकार रडारवर
यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी तुषार गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिना उलटून गेला तरी भिडेंविरोधात योग्य कार्यवाही झालेली नाही. त्यावेळी डेक्कन पोलिसांनी शहानिशा करून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटून गेल्यानंतर कोणत्याही हालचाली दिसत नसल्यानं डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि पुणे पोलिस आयुक्तांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भिडेंनी गांधी घराण्यातील महिलांचा अपमान आणि बेअब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेअब्रू आहे. त्यामुळं बेअबू् करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरूपाची वक्तव्ये करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये या सगळ्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली, असं सरकारी वकील असिम सरोदे यांनी सांगितलं आहे.
भिडे काय म्हणाले होते?
अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलतांना भिडे म्हणाले होते की, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असल्याचे सांगितले जाते, परंतु करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून त्यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार होते.