दिल्ली : पोलिसांच्या स्पेशल सेलने पुणे इसिस प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आणि आयएसआयएस (ISIS) मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा (Shahnawaz alias Shafi Uzzama) असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी मोस्ट वॉण्टेड होता. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
याबाबत दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाज (Shahnawaz alias Shafi Uzzama) हा दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या कोठडीतून पलायन करून तो दिल्लीत राहत होता. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. यापूर्वी एनआयएने आयएसआयएस पुणे मॉड्यूल प्रकरणात 7 जणांना अटक केली होती. (Most wanted terrorist Shahnawaz alias Shafi Uzzama arrested in Delhi in Pune ISIS module case)
राजधानी दिल्लीत इसिसचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला. सोमवारी (2 ऑक्टोबर) शाहनवाजला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. मात्र, पुणे इसिस प्रकरणात वॉन्टेड असलेले रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख हे दोन दहशतवादी अद्याप फरार आहेत. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.
तिन्ही दहशतवाद्यांनी आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याची क्षमता आहे. या कारणांमुळे पोलिसांना इतर दोघांनाही लवकरात लवकर अटक करायची आहे, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस आणि एनआयएच्या पथकांनीही दहशतवाद्यांच्या शोधात दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानसह उत्तरप्रदेश भागात छापे टाकले होते. काही ठिकाणच्या छाप्यात पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला आहे.