Download App

Devendra Fadanvis यांना कसबा, चिंचवडचे आले ‘टेन्शन’

  • Written By: Last Updated:

पुणे : भारतीय जनता पार्टीला (BJP) कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba-Chinchwad Bypoll) अंतर्गत नाराजीचा तीव्र फटका बसण्याची शक्यता असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा मतदार संघात खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी बुधवारी जवळपास सात तास बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केली आहे. तसेच यासाठी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) आणि गिरीश महाजन (Girish  Mahajan) या दाेन कॅबिनेट मंत्र्यांना येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत पुण्यात राहण्याचे आदेश दिले आहेत. एका खासगी पंचतारांकीत हॉटेलमध्ये या दोन मंत्र्यांची खास व्यवस्था करण्यात आली. पुण्यामध्ये पहिल्यांदाच भाजप विरुद्ध महाविकास आघाडील तीन पक्षांबरोबर निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपने अतिशय गंभीरतेने घेतल्याची पाहायला मिळत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस हे खास लक्ष ठेवून आहेत.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला जोरदार फटका बसला आहे. याच पद्धतीचा निकाल कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत लागला तर आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत होऊन संपूर्ण राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार पडले तर त्याचा थेट परिणाम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी वर्तवले आहे. त्यामुळे फडणवीस हे प्रचंड टेन्शनमध्ये असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांना पुण्यात येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत ठाण मांडून लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा देखील तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे. अमित शहा हे पुण्यात शिवसृष्टीच्या उदघाटन समारंभानिमित्त येत आहे. त्यांचाही कसबा पोटनिवडणुकाच्या अनुषंगाने फायदा करुन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी अमित शहा यांच्या दौऱ्याचा किती उपयोग होणार हे आता पाहावे लागणार आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक भाजपने गमावली तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच येत्या काळात होणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या महत्वाच्या महापालिकांसह इतर २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचंड मोठी यंत्रणा कामाला लावल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: देखील काल प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

 

Tags

follow us