पुणे : कसबा पोटनिवडणूक आता चांगलीच रंगू लागली आहे. या निवडणुकीत दररोज काहींना काही घडत आहे. यातच कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. नुकतेच रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी यावेळी मनसे कार्यालयात भेट दिली. या भेटीनंतर भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन कसब्यातील मनसे नेत्याला आला आहे.
पुण्यातील कसबा पोटनिवडणूक सध्या राज्यातील राजकारणात चांगलीच गाजत आहे. कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर पदयात्रेदरम्यान थेट मनसेच्या कार्यालयात गेले. पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. आणि धंगेकर हे महाविकास आघडीचे उमेदवार आहेत. असं असलं तरी धंगेकर हे मूळचे मनसैनिकच आहेत. ते कार्यालयात पोहचताच मनसेच्या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच स्वागत केलं.
दरम्यान एकीकडे हे सुरु असतानाच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस अलर्ट झाले. फडणवीस यांनी संजय काकडेंमार्फत थेट दीपक पायगुडेंसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीवर फडणवीस लक्ष ठेवून आहेत, हे माध्यमातून स्पष्ट झाले.
या निवडणुकीसाठी मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र रवींद्र धंगेकर यांनी याआधी देखील मनसेमध्ये आपले सहकारी आणि मित्र आहेत असे विधान केले होते. त्यामुळे शहर मनसे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार की भाजपच्या उमेदवारामागे उभे राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.