पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे आवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु, सरकारच्या वतीने गांभीर्याने पंचनामे केले जात नाही. त्यासाठी संपाचे कारण दिले जात आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुग्रह अनुदान मिळायला हवे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत कसलेही गांभीर्य नाही. आम्ही त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत आवाज उठवणार आहोत, असे माजी विधानसभा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राज्यात गारपीट, आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गारपीट, आवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळायला हवी. यासाठी राज्य सरकार काहीही करत नाही. तर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना अजिबात कशाचेचा गांभीर्य असल्याचे दिसत नाही.
राहुल गांधी मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही, नाना पटोले मोदींवर बरसले
केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार आहेत. मात्र, त्यांच्या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. सरकार फक्त राजकारणात व्यस्त आहे. सरकारच्या आतमध्ये काय चालू आहे याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील हे सरकार फार काळ तक धरेल अस वाटत नाही. त्यामुळे चालेल तोवर चालेल. एक दिवस कोसळलेल, असेच दिसत आहे. भाजप-शिंदे गट या दोन्ही आमदारांच्या मनातील भावना, शारिरीक हालचाली जरा अवघड दिसत आहेत. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळण्याचे संकेत मिळत असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहेच. खुद्द गृहमंत्र्यांचे घर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची कल्पना न केलेलीच बरी, अशी परिस्थिती आहे. याबाबत आम्ही गृह विभागाला या आठवड्यात अधिवेशनात विचारणार आहे. तर महाराष्ट्रातील सत्ता-संघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मात्र, त्यावर आताच काही भाष्य़ करता येणार नाही. न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधण योग्य होणार नाही. त्यामुळे आपल्याला या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच धार्मिक बाबाचे विचार मांडून काही होत नाही. इतर विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा केली जात आहे, असे सांगत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमावर टीका केली. तसेच या बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरीची घटना उघडकीस आल्याने गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश असल्याचे वळसे-पाटील यावेळी म्हणाले.