Download App

Pune By Election : मतदानासाठी दिव्यांगत्व ओळखपत्रग्राह्य धरले जाणार

  • Written By: Last Updated:

पुणे : जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचादेखील समावेश करण्यात आला आहे.

ओळखीसाठी बारा पुरावे…

मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (Driving Licence), पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) अंतर्गत भारताचे महानिबंधक (RGR) द्वारा जारी केलेले स्मार्टकार्ड, भारतीय पारपत्र (Passport), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यांगत्वाचे ओळखत्र (Unique Disability ID) यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

मतदार यादीवरून मतदाराची ओळख निश्चित होत नसल्यास मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी एक पुरावा ग्राह्य धरण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. परदेशातील मतदारांना केवळ ओळखीसाठी त्यांचा मूळ भारतीय पासपोर्ट सादर करावा लागेल.

मतदाराला त्याच्या/तिच्या मतदान केंद्राच्या मतदार यादीचा अनुक्रमांक जाणून घेण्याची सुविधा देण्यासाठी मतदानाची तारीख, वेळ आदी नमूद असलेली मतदार माहिती चिठ्ठी देण्यात येणार आहे. यात मतदान केंद्र, तारीख, वेळ आदी माहितीचा समावेश असेल. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या दिवसाच्या आधी माहिती चिठ्ठी वितरित केली जाईल, परंतू अशी चिठ्ठी मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Tags

follow us