पुणे : बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) कोणतेही आरोप केले नाहीत. सोशल मिडीया आणि माध्यमात ज्या बातम्या सुरु आहेत ते पत्र कोणाजवळ आहे का? असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्या बातम्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले.
मुळ प्रश्न आहे की आदाणी कंपनीने एलआयसीचा जनतेचा पैसा लुटला, बॅंकांचा पैसा लुटला त्या विरोधात राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी, सोनिया गांधी हे लोकसभेत जनतेच्या पैशाचा हिशोब मोदी सरकारला विचारत आहेत. त्याचं उत्तर द्यायला ते तयार नाहीत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
संपूर्ण देशांमध्ये एलआयसी आणि बॅंकाच्या समोर काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू आहे. आज पुण्यात मी, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करत आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले.
जनतेचे प्रश्न दुर्लक्षित रहावेत यासाठी भाजप अशाप्रकारच्या बातम्या पेरत आहेत. हे सर्व ठरवून केलं जात आहे. यातून काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेवर परिणाम होणार नाही, असे पटोले यांनी सांगितले.
माजी मंत्री रमेश बागवे भाजपमध्ये जाणार नाहीत. थोड्या वेळाने ते आमच्यात येतील, असे पटोलेंनी सांगितले. ते पुढं म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंचा अजून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फोन आलेला नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.
प्रज्ञा सातव यांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आम्ही स्वत: त्यांच्या घरी गेलो होतो. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची ते भाषा करतात पण ती फोनवर विचारून कसे चाललं? त्यांना सत्तेची गर्मी आली असेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.