पुणे : कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्यात फेकून देण्यात आले आणि दुसऱ्या ब्लड स्मॅपलला अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीहरी हरलोर यांनी रिपोर्ट बदलण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते.
दरम्यान, डॉ. अजय तावरे यांचा हा काही पहिलाच कारनामा नाही. डॉक्टर तावरे आणि वाद हे नेहमीचेच गणित आहे. यापूर्वीही तीन प्रकरणात तावरे यांचे नाव समोर आले होते. तसेच डॉ. तावरेचे आमदार सुनील टिंगरे यांच्याशीही खास कनेक्शन आहे. (Dr. Ajay Taware, who managed the report of the juvenile accused, has a special connection with MLA Sunil Tingre.)
तावरे यांचे नाव मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटमध्ये समोर आले होते. कोल्हापूरमधील एका महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे अमिष दाखवून तिचे मूत्रपिंड अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. मात्र आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने त्या महिलेने पोलीसांत तक्रार दाखल केली. तसेच रुग्णाशी पत्नीचे नाते आहे असे सांगून हे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते. या प्रकरणी गदारोळ झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर अधीक्षक असलेल्या डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी ससूनमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. पण शवविच्छेदन अहवालाच मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या प्रकरणाच्या चौकशी समितीमध्ये डॉ. तावरे दोषी आढळले होते. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. यात तावरे यांची उचलबांगडीही करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा त्यांची नियुक्ती झाल्याचे आता समोर आले आहे.
याच उंदीर प्रकरणात डॉ. अजय तावरे याने पोस्टमार्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचे समोर आले होते.
आमदार सुनील टिंगरे यांचे कल्याणीनगर अपघात प्रकरणात नाव समोर आले होते. त्यांनी येरवडा पोलीस स्थानकात जाऊन संबंधित मुलाची भेट घेतली, पोलिसांवर दबाव आणला असा आरोप झाला. आता याच प्रकरणात अटक झालेल्या डॉ. तावरे याच्याशी आमदार टिंगरे यांचे खास कनेक्शन आहे. त्यांच्याच पत्राने मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणात निलंबित झालेल्या डॉ. तावरेची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गत डिसेंबरमध्ये तावरेंच्या नियुक्तीचे आदेश दिल्याचे समोर आले होते.