Video : 40 वर्षांचा अनुभव, शिक्षकांचे प्रश्न अन् विधानपरिषदेची निवडणूक; डॉ. बब्रुवाहन रोंगेंनी मांडला आपला पट

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी 40 वर्षांचा शैक्षणिक प्रवास उलगडला.

News Photo   2026 10 09T180935.434

 Pune Teachers Constituency

 Pune Teachers Constituency : अर्ज भरला, त्याचा मोठा आनंद झाला आहे. (Pune) गेल्या 40 वर्षांच्या अनुभवाचा फायदा राज्यपातळीवर व्हावा, अशी सर्व मित्र आणि सहकाऱ्यांची भावना होती. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेत अर्ज दाखल केला, असं म्हणत पुणे शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात उतरलेले स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी आपला पट उलगडला आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.

तसं पाहता, मी सामान्य कुवतीचा विद्यार्थी होतो. कुठल्याही स्पर्धेत नव्हतो किंवा सर्वात हुशार विद्यार्थ्यांमध्येही नव्हतो. गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने एक दिशा मिळाली. नववीपर्यंत जेमतेम मार्क पडत होते. पण, ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ असं म्हणत त्यावेळच्या मुलांमध्ये दहावीला प्रथम आलो. त्यानंतर पुढच्या शिक्षणाला एक वेगळं वळण मिळालं. पुढील शिक्षणासाठी कराडला गेलो. त्या कॉलेजमधील वातावरण पाहून दडपण आलं. पण, आपणही इंजिनीअर व्हायचं, असं ठरवलं, अशी आठवणही रोंगे यांनी यावेळी सांगितली.

तमिळ कुटुंबात जन्म, दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा; शांततेच्या नोबेल मिळालेल्या पिल्लई कोण आहेत ?

सुरुवातीला काहीच कळत नव्हतं. मग लिहून अभ्यास करण्याचं ठरवलं. दोन वर्षं लिहून लिहून अभ्यास केला. या दोन वर्षांच्या अभ्यासामुळे कुठं प्रवेश घ्यायचा, याचा अधिकार मला मिळाला होता. पुढच्या काळातही लिहून लिहून अभ्यास सुरूच ठेवला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठात गेलो. पुढे मुंबईतील आयआयटीमध्ये शिक्षण घेतलं. नोकरीची संधी असतानाही पुढचं शिक्षण सुरू ठेवलं, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. मोठ्या संघर्षातून आणि ज्ञानाच्या जोरावर हे मिळवलं आहे. त्यामुळे इतर उमेदवारांना याची भीती किंवा दडपण वाटणं साहजिक आहे, असंही ते म्हणाले.

इतकं शिक्षण झाल्यानंतर गावाकडे गेल्यावर काय करावं, हे लवकर सुचलं नाही. त्यावेळी तिथं इंजिनीअरिंग कॉलेज होतं. तिथं संधी मिळाली. त्यानंतर आता काय करायचं, यावर विचार केला. मित्रांशी चर्चामसलत केली. शिक्षणाचं चित्र पाहता इंजिनीअरिंग कॉलेज काढायचं ठरवलं. जवळ पैसा नव्हता, साधनं नव्हती; पण सगळ्यांच्या सहकार्याने हे उभं राहिलं आहे, असंही रोंगे यांनी यावेळी सांगितलं.

शिक्षक मतदारसंघातून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात. यंदाच्या मतदार नोंदणीत काही फरक पडला आहे का, असा प्रश्न विचारला असता, फारसा फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. पाच जिल्हे आणि 58 तालुक्यांमध्ये मी फिरतोय. गेलं सव्वा वर्ष हे काम सुरू आहे. माझी ओळख करून देतोय. प्रत्येक शिक्षकाचे प्रश्न समजून घेतोय. ते कसे सोडवता येतील, यावर चर्चा करतोय. त्यामुळे माझ्याबद्दल एक सहानुभूती आहे. त्यामुळं चांगलं घडेल, अशी आशा आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. माझ्यासह माझी यंत्रणाही सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे, असं म्हणता येईल, असंही ते म्हणाले.

Exit mobile version