मोठी बातमी : एफडीएच्या पथकाकडून ट्रकचा सहा तास थरारक पाठलाग; 1 कोटींचा गुटखा पकडला

FDA Action: मध्य प्रदेशमधून गुटखा असलेला ट्रक भिवंडी येथे येत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.

FDA

FDA

FDA Action: राज्यात गुटखाबंदी असताना तो बाहेरच्या राज्यातून बेकायदेशीरपणे आणून राज्यात विकला जात आहे. एफडीएच्या (FDA) पथकाने तब्बल सहा तास एका ट्रकचा पाठलाग करत तो ट्रक पकडला. त्या ट्रकमधून तब्बल 1 कोटी रुपयांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा जप्त केलाय. यात बुलढाण्यातील खामगाव येथील गुटखाकिंग निलेश राठीचा सहभाग आढळून आला आहे. (FDA Team’s Thrilling Six-Hour Chase of Truck; Gutka Worth ₹1 Crore Seized)

29 लाख 95 हजार रुपयांचा रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, 9 लाख 60 हजार रुपयांचा तुळशी रॉयल जाफरानी जर्दा, 25 लाख रुपयांचा तानसेन सुगंधित पानमसाला, 2 लाख 64 हजार रुपये किंमतीचा टी. ओ. प्रिमियम जर्दा, 26 लाख रुपयांचा आर. एम.डी पानमसाला व ट्रक असा मिळून एक कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वाहनचालक नफीस मेहबूब खान (वय 40, रा. हरियाणा), मालक व पुरवठादार निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा), अरुण पाटील (रा. जळगाव मालक / पुरवठादार) ४. J.M.D. Enterprises चा वाहन मालक, वाहतूकदार संजय माटा यांच्या विरुद्ध चाकण पोलिस स्टेशन विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाहनचालक नफीस खान याला अटक करण्यात आली आहे.

सहा तास पाठलाग करून ट्रक पकडला
मध्य प्रदेशमधून गुटखा असलेला ट्रक भिवंडी येथे येत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. हा ट्रक मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने येत होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता एफडीएने कारवाई सुरू केली होती. परंतु ट्रकने नियोजित मार्ग बदलला. ट्रक संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने जाऊ लागला. वाहनाने मार्ग बदलल्याचे लक्षात येताच, त्याच्या संभाव्य मार्गांवर अन्न व औषध प्रशासनाची पथके तातडीने सक्रिय करण्यात आली. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी गाडी आडवी लावून तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता ट्रक तसाच पुढे नेला. यानंतर सुरू झाला थरार पाठलाग. सावळे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला शेवटी स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौक येथे अखेर ट्रकला शिताफीने अडविण्यात आले. सुमारे सहा तासांच्या या पाठलागानंतर रात्री सुमारे आठ वाजता ट्रक ताब्यात घेण्यात आला. ट्रकची तपासणी करत मोठा साठा जप्त करण्यात आला. परंतु आता संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणण्याचे आवाहन पोलिस आणि एफडीएसमोर आहे.

Exit mobile version