Download App

राज्यसभा निवडणूक : अशोक चव्हाणांपाठोपाठ मेधा कुलकर्णींची कागदपत्रांसाठी धावाधाव

पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अद्यापही भाजपच्या (BJP) तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. सध्या नुकतेच भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पाठोपाठ महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचेही नाव राज्यसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले असून त्यांनीही कागदपत्रांची जमावाजमव करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. (Former Kothrud MLA Medha Kulkarni has been named as a possible Rajya Sabha candidate)

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अन्य राज्यांमधील भाजप उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली आहेत. मात्र मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या भाजपची सत्ता असलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. महाराष्ट्रातील भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने भाजपचे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. याच तीन जागांवरुन अनेक जण खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत. यात भाजपतर्फे विनोद तावडे, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर या नेत्यांचे अर्ज तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती आहे.

मेधा कुलकर्णींची कागदपत्रांसाठी धावाधाव

मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेत ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना हे प्रमाणपत्र आयोगाला सादर करावे लागते. पुण्यात मागील काही दिवसांपासून ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारून चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते.

दिल्लीतील सातही जागांवर ‘आप’ लढणार, केजरीवालांच्या घोषणेने इंडियाला धक्का

त्यापाठोपाठ मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन्ही गोष्टींमुळे भाजपकडून ब्राह्मणांना गृहीत धरले जात आहे, त्यामुळेच उमेदवारी दिली नाही, अशी भावना ब्राह्मण समाजात निर्माण झाली. त्याचा फटका कसबा पोटनिवडणुकीत बसला आणि रासने यांचा पराभव झाला, असे मानले जाते. त्यामुळेच पक्षाने कुलकर्णी राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे.

‘ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन लालटेन भारी पडणार! राजदच्या दाव्याने बिहारमध्ये वाढले राजकीय तापमान

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देताना दोन आयात आणि एक निष्ठावंत किंवा एक आयात आणि दोन निष्ठावंत असे सूत्र भाजपकडून ठरविले जाण्याची शक्यता आहे. आयात उमेदवारांमध्ये अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, आणि अमरिश पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. तर निष्ठावंतांमध्ये कुलकर्णी यांच्यासोबतच विनोद तावडे, पंकजा मुंडे, डॉ. अजित गोपछडे, माधव भंडारी आणि विजया राहटकर या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या भाजपच्या तीन जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

follow us