चाकण जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील इतर राजकीय पक्षांचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्वासात घेत नसल्याने माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
या नाराजीतून वेगळा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळा’चे काटे गळण्याची चिन्हे गडद झाली आहेत. खेडच्या राजकारणात आगामी काळात भूकंप घडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी नुकतीच अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यांच्या पत्नी आंबेठाण- पाईट जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मोठी बातमी! अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांची चौकशी, काय म्हणाले पोलीस?
त्याचबरोबर, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे हे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंगसे यांची पत्नी कुरुळी- आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी इच्छुक आहे. सध्या मुंगसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. खेड तालुक्यातील या दोन्ही नेत्यांच्या पुढील काळातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संभाव्य प्रवेशामुळे दिलीप मोहिते व त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र नाराज आहेत. त्यामुळे ते वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत. ऐनवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणात उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांचे आयात उमेदवारांमुळे नक्की काय होणार? हा सवाल दिलीप मोहिते यांच्यापुढे आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी द्यायची अन् आपल्या यांच्या समर्थकांना मात्र उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीती मोहिते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आम्हाला विश्वासात न घेता प्रवेश देत आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार? हा सवाल आहे. अजित पवार हे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताकद देत नाहीत. कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्ते जी भूमिका घेतील, त्यासोबत मी राहणार आहे. कार्यकर्त्यांनी याबाबत बैठकाही घेतल्या आहेत.
