Funny Moments Of PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. 1) पुण्यात टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. यावेळी मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यांच्या या भाषणाच्या सुरूवातीममुळे त्यांनी लाखो पुणेकरांची मनं जिंकून घेतली. पण, मोदींना मिळालेल्या पुरस्कार सोहळ्याशिवाय या कार्यक्रमात अशा काही गोष्टी घडल्या ज्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नेमक्या या घटना काय हे आपण जाणून घेऊया. या सर्व मजेशीर घटनांचे व्हिडिओ खाली दिलेले आहेत ते पाहायला विसरू नका.
मोदींआधी मंचावर पवारांची उपस्थिती
सर्वात पहिले तर, मोदींचे स. प महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सगळ्यात पहिले मंचावर एकटेच जाऊन बसले होते. त्यांचा हा फोटो मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरस होत आहे.
पवारांची मोदींना तर मोदींची अजितदादांना थाप
मोदींच्या पुणे दौऱ्यात आणखी एक घटना घडली ती म्हणजे ज्यावेळी मोदी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दाखल झाले त्यावेळी त्यांनी उपस्थितांची भेट घेत हस्तांदोलन केले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीसांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मोदी आणि पवार जेव्हा समोरासमोर आले त्यावेळी पवारांनी हसत हसत मोदींशी हात मिळवला आणि मोदी पुढे सरकरत असताना त्यांच्या पाठीवर थाप मारली. तर, दुसरीकडे मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर थाप मारली त्यावेळी अजित पवारांनी सूचक हास्य केले. या दोन्ही घटनांची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे.
शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एका मंचावर उपस्थित राहिले होते. त्यामुळे ते समोरा समोर आल्यानंतर नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, आणि घडलंही तसंच. मंचावर शरद पवार आणि अजित पवार आले असता अजितदादांनी पवारांना बघून आपली वाटच बदलली.
शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. अजितदादांच्या अशा मागून येण्याने आणि जाण्याने मात्र अजितदादांना शरद पवारांशी समोरासमोर भेटण्याची हिंमत होईना अशी चर्चा रंगली आहे.
मोदींचं जीव तोडून भाषण तर, CM शिंदेंची ब्रह्मानंदी टाळी
स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरील पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मोदींच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मेट्रोचे लोकार्पण तसेच अन्य गोष्टींची पायभरणी करण्यात आली. यावेळी मोदींनी पुण्याच्या विकासावर भाष्य करताना विरोधकांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. मोदी हे भाषण अतिशय जीव तोडून करत होते. मात्र, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोळा लागल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकीकडे मोदींचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री मात्र, निद्रीस्त अवस्थेमध्ये दिसून आल्याने पुणेकरांमध्ये सध्या CM शिंदेंच्या ब्रह्मानंदी टाळीची चर्चा रंगली आहे.