Download App

काश्मीरमध्ये यंदा घुमणार ‘गणपती बाप्पा मोरयाsss’चा आवाज; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा पुढाकार

  • Written By: Last Updated:

पुणे : काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये (Ganapatiyar Trust) गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मंडळे एकत्र येऊन आम्ही हा मूर्ती प्रदान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामुळे काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल, असे मत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवाचे प्रमुख पुनीत बालन (Puneet Balan) यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह पुण्यातील सहा मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, श्रीनगरच्या गणपतयार मंदिराचे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रतिकृती सुपूर्द केली. यंदा काश्मीरमध्ये दीड दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. यासाठी कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ या सात मंडळांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गुरूवारी या सर्व मंडळांनी एकत्र येत कश्मीरसाठी मूर्ती दान केली. हा कार्यक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला. तत्पूर्वी अभेद्य ढोलताशा पथकाचे जोरदार वादन झाले.

नागरिकांचे हेलपाटे वाचणार ! शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालय उद्यापासून सुरू 

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनित बालन, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, कसबा गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरी गणेशोत्सवाचे प्रतिनिधी अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काश्मीरमधील गणपतीयार ट्रस्टचे संदीप कौल म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकाराने आम्ही काश्मीरमध्ये प्रथमच गणेशोत्सव साजरा करत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध गणपतयार मंदिरात येत्या गणेशोत्सव चतुर्थीला आम्ही विधीनुसार या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असून दीड दिवसांनी तिचे विसर्जन होणार आहे. काश्मीरमध्ये अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ते म्हणाले.

तर श्रीकांत शेटे म्हणाले, काश्मीर हा देशाचा स्वर्ग आहे, बाप्पाचा आशीर्वाद येथे वाढण्यासाठी हा बाप्पाचा आशीर्वाद म्हणून ही मूर्ती प्रदान केली आहे. उन्नत, सशक्त, शांती, सुख काश्मिर येथे नांदण्यासाठी ही बाप्पाची मूर्ती आम्ही सर्वजण एकत्र येऊन देत आहोत.

यावेळी अण्णा थोरात म्हणाले, पुण्याप्रमाणे काश्मीरमध्येही गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पुढाकार घेण्यात आला. पुण्यात ज्याप्रमाणे सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही गणेशोत्सव साजरा करावा, अशी आमची भावना आहे.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले की, हिंदुस्तानात गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी केली. आज हाच गणेशोत्सव इतर देशातही साजरा होतो. मग तो आपल्याच देशात काश्मीरमध्ये का नाही? असा प्रश्न पडला आणि त्यामुळेच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही सर्व मानाच्या मंडळांनी घेतला. या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात सामाजिक सलोखा वाढण्यासोबतच सुख-समृध्दीही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us