कल्याणीनगरमधील जीवघेणा अपघात हा सध्या ‘हॉट टॉपिक’ बनला आहे. या प्रकरणात सुरुवातीलाच झालेली स्थानिक आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांची एन्ट्री, त्यानंतर पोलिसांकडून (Pune Police) आरोपीला मिळालेली व्हिआयपी ट्रिटमेंट, त्याला अवघ्या 14 तासांत मिळालेला जामीन, आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये झालेले बदल या सगळ्याच्या गोष्टींनी पुण्याचं राजकीय आणि सामाजिक वर्तुळ ढवळून निघाले. वाहतुकीच्या नियमांचाही उहापोह झाला. याच अपघातानंतर पब आणि बारचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar), येरवड्याचे पोलीस निरीक्षक या सगळ्यांपर्यंत सगळ्यांचीच प्रतिमा मलिन झाली. (Gopinath Munde who was the Home Minister came to Pune and raided the pub itself)
पण 1990 च्या दशकात राज्याला लाभलेल्या गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी याच पब आणि बारविरोधात मोर्चा उघडला होता. इतकेच नाही तर त्यांनी एका पबवर रेडही टाकली होती. त्यामुळेच आजच्या संदर्भाने गोपीनाथ मुंडे यांची आठवण पुणेकरांना नक्की होत आहे… पाहुया नेमके काय घडले होते?
साधारणपणे 1990 च्या दशकात पुण्यात पब येण्यास सुरुवात झाली होती. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही काही दाक्षिणात्य लोकांनी बारमध्ये ‘पब कल्चर’ रुजवण्यास सुरुवात केली. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात याची पहिल्यांदा सुरुवात झाली. त्यानंतर जसजसा हा परिसर वाढत गेला तसतसे या परिसरात मोठ्या प्रमाणावर बार, रेस्टॉरंट आणि पब सुरू झाले. साधारणपणे 2000 नंतर पुण्यात आयटी कंपन्या दाखल झाल्या आणि पब संस्कृतीला अधिक गती मिळाली.
जसजसे पब वाढत होते तसतशी गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत होती. अनेक गुन्हेगारी टोळ्या या डान्सबारकडून वसुलीदेखील करीत होत्या. अशात एकदा दाऊदच्या टोळीशी संपर्क असल्याच्या संशयावरून टेन डाऊनिंग स्ट्रीट या पबच्या मालकावर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला. यावेळी हॉटेलमध्ये पुण्यातील एका प्रख्यात चिकन ब्रँडच्या मालकाचा मुलगादेखील पार्टीसाठी आलेला होता. तोदेखील यामधून बालंबाल बचावला. या हल्ल्यानंतर तो मालक घाबरुन हॉटेल बंद करून तो गावी निघून गेला.
रुबी हॉल रुग्णालय आणि जहांगीर रुग्णालयाजवळ याच काळात ‘ब्लॅक कॅडिलॅक’ नावाचा पब सुरू झाला होता. त्याचा मालकदेखील दाक्षिणात्यच असल्याचे सांगितले जाते. या पबचीदेखील मोठ्या प्रमाणावर चर्चा पुण्यात घडत होती. हा पब बंद करण्यात यावा, याकरिता राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलने केली जात होती. मात्र पोलीस, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्या काळीही या मागणीकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होतच होते.
या ‘ब्लॅक कॅडिलॅक’ नावाच्या पबची ख्याती थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पसरली होती. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे एकदा पुणे दौऱ्यावर आलेले होते. त्यांना या पबविषयी माहिती समजली. त्यांना हा प्रकार आवडलेला नव्हता. मुंडे आणि तत्कालीन समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे या दोघांनी अचानक नगर रस्त्यावरून जात असताना आपला ताफा थेट या पबच्या आवारात घुसवला. या पबवर ‘रेड’ टाकण्यात आली.
खुद्द गृहमंत्रीच पबमध्ये घुसल्याने सर्वच यंत्रणांची मोठी पंचाईत झाली होती. त्यानंतर कारवाई करीत हा पब बंद करण्यात आला. मात्र कालांतराने हा पब पुन्हा सुरूदेखील झाला. पुढे अनेकांनी पब सुरू केले. त्याकाळी पुणेकरांना हे एक मोठे आकर्षण वाटत होते, परंतु इथे चालणाऱ्या गैरप्रकारांमुळे पुण्याची संस्कृती बिघडत चालल्याची ओरड सुरू झाली होती. त्यामुळे पुण्यातून हे पब हद्दपार करण्यासाठी सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनीही वेळोवेळी आंदोलने केली.
आजही अपघात प्रकरणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत बार आणि पब मालकांविरोधात मोर्चा उघडला आहे. हे बार आणि पब बंद व्हावेत म्हणून इथले रहिवासीही मागणी करत आहेत. त्यांना इथे राहताना, फिरताना, येताना-जाताना भीतीदायक वातावरणात वावराव लागत असल्याची तक्रार हे रहिवासी करतात. त्याचमुळे पुणेकरांना आता गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्याच एखाद्या धडक कारवाईची गरज आहे हे नक्की.