ससूनमधील डॉक्टरला कोणी मॅनेज केले? आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता

ससूनमधील डॉक्टरला कोणी मॅनेज केले? आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता

पुणे : कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरनोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्यात फेकून देण्यात आले आणि दुसऱ्या ब्लड स्मॅपलला अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीहरी हरलोर यांनी रिपोर्ट बदलण्यासाठी तीन लाख रुपये घेतले होते.

दरम्यान, या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. टिंगरेंचे नाव यापूर्वीच अपघात प्रकरणात समोर आले होते. त्यांनी येरवडा पोलीस स्थानकात जाऊन संबंधित मुलाची भेट घेतली, पोलिसांवर दबाव आणला असा आरोप झाला. त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. विशाल अगरवाल हे आपले स्नेही असून त्यांचा फोन आल्याने केवळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण गेलो होतो. तिथे आपण कोणत्याही कामात ढवळाढवळ केली नव्हती, असा खुलासा त्यांनी केला होता. (NCP MLA Sunil Tingre is also likely to be investigated in the Kalyaninagar accident case)

अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये; भुजबळांनी हत्यार उपसलं

पण आता याच प्रकरणात अटक झालेल्या डॉ. तावरे याच्याशी आमदार टिंगरे यांचे खास कनेक्शन समोर आले आहे. खरंतर डॉ. अजय तावरे यांचे एप्रिल 2022 मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणात निलंबन झाले होते. या प्रकरणात त्यांची चौकशीही सुरु होती. मात्र ही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच डिसेंबर 2023 मध्ये तावरेची अधीक्षकपदी पुनर्नियुक्ती झाली होती. ही नियुक्ती करण्यासाठी आमदार टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते. याच शिफारशीनुसार मुश्रीफ यांनी तावरेची नियुक्ती केल्याचे समोर आले होते. त्यामुळेच आता आमदार टिंगरे यांचा डॉक्टरांना मॅनेज करण्यात हस्तक्षेप आहे का? असा संशय पोलिसांना आहे. त्यावरुन त्यांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे.

असं फुटलं ससूनच्या डॉक्टरांचे बिंग :

डॉ.अजय तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक मेडिसीन अँन्ड टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉ. श्रीहरी हरनोर हे अपघात विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. संबंधित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी सकाळी नऊ वाजता ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर अकरा वाजता श्रीहरी हरलोल यांच्या विभागाने त्याचे ब्लड सँपल घेतले. या सॅम्पलमध्ये दारुचा अंश येऊ शकतो, हे लक्षात येताच ते बदलायचे ठरवले. त्यासाठी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले.

Pune Car Accident : ”अटक केलेले ससूनचे डॉक्टर मुश्रीफांच्या आशीर्वादाने काम करत होते”

यानंतर चक्र फिरली. गेल्या काही दिवसांपासून रजेवर असलेले डॉ. अजय तावरे अॅक्टिव्ह झाले. तावरे यांनी ब्लड सॅम्पल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या एका रुग्णाचे ब्लड सॅम्पल टेस्टिंगसाठी देण्यात आले. तर संबंधित मुलाचे स्मॅम्पल हे थेट कचऱ्यात फेकून देण्यात आले.  थोडक्यात अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. पोलिसांनी या प्रकरणात खबरदारीचा उपाय म्हणून संध्याकाळी दुसऱ्या एका रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे दुसऱ्यांदा नमुने घेतले. त्याची DNA टेस्ट करायचे ठरवले आणि इथेच डॉक्टरांचे बिंग फुटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज