Pune Graduate Election : पुणे पदवीधर निवडणूक (Pune) आव्हानात्मक नाही, पण हि एक संधी आहे. आजपर्यंत लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पाहतो. मात्र, विधान परिषदेमध्येही धोरणात्मक निर्णय घेतले जातात, हे आणखी अनेक लोकांना माहिती नाही. मोठ्या संख्येने पदवीधर व्यक्ती या मतदारसंघात आहेत आणि त्यांच्या समस्या केवळ वीज, पाणी व आरोग्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर इतरही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे मी केवळ पदवीधरांची निवडणूक म्हणून पाहत नाही, तर हि करदात्यांचीही निवडणूक आहे. प्रत्येक पदवीधर करदाता आहे आणि त्याला प्रथम न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी पुणे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आहे, असं स्पष्ट मत हर्षदा देशमुख जाधव यांनी व्यक्त केलं.
पुणे पदवीधर मतदारसंघ जुन्नर ते अक्कलकोटपर्यंत पसरलेला आहे. या मोठ्या मतदारसंघात निवडणूक लढवताना काही आव्हानात्मक किंवा ‘जमेल का?’ असं वाटतं का, या प्रश्नावर त्या बोलत होत्या. त्यांनी ‘लेट्सअप मराठी’ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत संपादक योगेश कुटे यांनी त्यांना राजकारणातील प्रवेश, मतदारसंघातील आव्हाने, शिक्षण, रोजगार आणि निवडणुकीतील भूमिकेसह विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले.
तुम्ही राजकारणात यावं, असा आग्रह वडिलांचा होता की सासऱ्यांचा, या प्रश्नावर हर्षदा म्हणाल्या की, दोघांचाही आग्रह नव्हता. वडील अपघाताने राजकारणात आले आणि त्यांना राजकारणात यायचं नव्हतं. सासरे व्यवसायात होते. व्यवसायातून त्यांनी समाजकारण केलं आणि त्यामध्ये मोठं स्वप्न पाहिलं, ते आज त्यांनी पूर्ण केलं आहे, असंही त्या म्हणाल्या. कुठलाच राजकारणी आपल्या मुलांना ‘तू राजकारणात ये’ असं सांगत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचं ‘ड्रीम सोशल फाऊंडेशन’ आहे आणि समाजकारणाच्या माध्यमातून काम सुरू आहे. राजकारणात येण्यासाठी माझ्या आईने मला प्रोत्साहन दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध
‘जर तुझ्यासारखी चांगलं बोलणारी, हुशार आणि विचार करणारी मुलगी गावखेड्यात चुलीसमोर बसली, पण तिच्याकडे हि संधी नाही आणि तुझ्याकडे आहे. जर हि संधी तू घेतली नाहीस, तर हा तिच्यावर अन्याय आहे,’ असं आई मला म्हणाल्या, अशी आठवण हर्षदा यांनी सांगितली. पुणे पदवीधर मतदारसंघातील आव्हानांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, लहानपणापासूनच या मतदारसंघातील सर्व भागांत फिरत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची पूर्वतयारी आणि अभ्यास झालेला आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 45 लाख पदवीधर आहेत, तर त्यावरून पाच जिल्ह्यांत सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त पदवीधर असतील, असं त्यांनी सांगितलं.
2020 मध्ये 4 लाख 26 हजार नोंदणी झाली होती. त्यातीलही केवळ 50 ते 52 टक्के लोक मतदान करतात. खरं तर, हि दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षित लोकांमध्ये मोठी अनास्था आहे आणि ती दूर करणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या. या मतदारसंघातील सर्वात मोठे प्रश्न शिक्षण आणि त्यानंतर रोजगाराचे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणातील स्पर्धेबाबत विचारलं असता, कितीही स्पर्धा असली तरी आपलं उद्दिष्ट स्पष्ट असलं पाहिजे. आज कुठल्या क्षेत्रात स्पर्धा नाही? असा सवाल करत सर्वच क्षेत्रांत मोठी स्पर्धा असून आपण फक्त काम करत राहावं आणि त्यातून विश्वासार्हता कमवावी, असं त्या म्हणाल्या.
वडिलांचा लाल दिवा आणि प्रशासनातील दबदबा पाहून राजकारणात यावं, असं वाटलं का, या प्रश्नावर हर्षदा म्हणाल्या की, जन्मच वडिलांकडे लाल दिव्याची गाडी असताना झाला आहे. त्यामुळे लाल दिव्याच्या गाडीचं किंवा मोठ्या ताफ्याचं कधीही आकर्षण राहिलेलं नाही. यावेळी त्यांनी आपल्या शिक्षणाबद्दल आणि तांत्रिक ज्ञानाबद्दलही माहिती दिली. राजकारणात कोणता झेंडा घ्यायचा, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, योग्य वेळी निर्णय घेऊ, असंही हर्षदा देशमुख जाधव यांनी स्पष्ट केलं.
