पुणेः मात्री मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. हर्षवर्धन पाटील हेच तुतारी चिन्हावर इंदापूरमधून उमेदवार असणार आहे. परंतु आता हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार यांच्या समर्थकांनी जाहीरपणे मेळावा घेऊन तीव्र विरोध दर्शविला आहे. हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिल्यास, त्यांच्याविरोधात बंडखोरी केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या मेळाव्यातून एक अर्थाने शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची कोंडीच करण्यात आली आहे.
आता अजितदादांकडे इनकमिंग, कॉंग्रेस आमदार सुलभा खोडके बांधणार घड्याळ, दिवस अन् वेळ ठरली…
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या मैदानात झालेल्या विराट परिवर्तन मेळावा झाा. त्यात आप्पासाहेब जगदाळे, डॉ. संदेश शहा, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटलांवर जोरदार प्रहार केले आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, विठ्ठल आहेत तर खासदार सुप्रिया सुळे देखील आमच्याच आहेत. त्यांनी इंदापूर विधानसभेचा आमच्या तंबूत घुसलेला उमेदवार न बदलल्यास भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल असा सूचक इशारा सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिला. यावेळी सर्वच वक्त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी सभेतील सर्वांनी हात करून उमेदवार न बदलल्यास अपक्ष अर्ज दाखल करण्यास पाठिंबा दर्शविला आहे.
दशरथ माने पुढे म्हणाले, 1952 पासून तालुक्यात पाटील घराणेशाही सुरू आहे. आता तर पाटील घराण्याचे बंटी बबलू देखील राजकारणात आले आहेत. ही तीन आदमी पार्टी आमच्या तंबूत घुसली आहे मात्र आमच्याकडे बांबू आहेत. हर्षवर्धन पाटील चांगला दिसतोय, उंचापुरा आहे मग त्यांना मोदीच्या जागेवर बसवा किंवा विधानपरिषद, राज्यसभेवर घ्या, आमचे काही म्हणणे नाही. आम्ही दत्तात्रय भरणे यांना कंटाळलो तर हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी लाद ण्यात येत आहे. पाटील यांनी तालुका विकास आघाडी, शिवसेना, भाजप व काँग्रेस ओरबाडून खाल्ली आहे. हा माणूस सर्वांना मॅनेज
करतो मग आम्ही काय गवत उपटायचे काय ? असा संतप्त सवाल करत जर निर्णय बदलला नाही तर आम्ही 110 टक्के लढू. वेळ प्रसंगी जेलमध्ये बसू पण लढून परिवर्तन करत जिंकूनच दाखवू असा इशारा माने यांनी दिला.
भाचा मामाला फसवतोय, जगदाळेंचा निशाणा
जिल्हा बँकेचे संचालक तथा प्रबळ इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, हर्षवर्धन पाटील व माझे भांडण नाही पण ते शब्द पाळत नाहीत. आमचे मामा भाचे असे नाते आहे मात्र भाचा मामाला फसवतोय. नात्याने मी मोठा आहे तर ते वयाने मोठे आहेत. त्यांनी पक्ष प्रवेश करण्यापूर्वी शरद पवार, जयंत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीची देखील माहिती आम्हाला दिली नाही. श्रध्येय शंकरराव पाटील उर्फ भाऊ, त्यांची कन्या पद्माताई पाटील, माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप, गोकुळदास शहा, मुकुंदशेठ शहा, भरत शेठ शहा यांना संस्थेतून त्यांनी बाहेर काढले.
सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत 26 हजार मतांचे लीड दिले, त्यात अदृश्य शक्ती म्हणून आमचा हात आहे असे खोटे वक्तव्य भाऊंच्या पुतळ्यासमोर श्री पाटील यांनी पक्ष प्रवेश सोहळ्यात केले आहे. त्यांनी सर्वांना फसविले असून आम्हा सर्वांचा तळतळाट त्यांना निश्चित लागणार आहे कारण हा जनतेचा आवाज आहे. सन 2014 मध्ये मला आमदारकीचा शब्द दिला होता. त्यावेळी दत्तात्रय भरणे आमदार झाले. त्यानंतर 2109 मध्ये विजयसिंह पाटील यांच्या साक्षीने मला हर्षवर्धन पाटील यांनी पुढील वेळी आमदारकीचा शब्द दिला मात्र आता त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदा भरणे मामांनी तर दुसऱ्यांदा भाचे पाटील यांनी फसविले. त्यामुळे यंदा हा उमेदवार न बदलल्यास तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अपक्ष लढू.
इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या कार्यामुळे इंदापूर नगरपरिषद देश पातळीवर पोहोचली आहे. भरतशेठ शहासारखे चांगले व प्रामाणिक माणसे आपल्यासोबत आहेत. त्यामुळे तुम्ही परिवर्तनासाठी आम्हाला साथ द्या, तुमच्या विश्वासास तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भरत शहा, बाबासाहेब चवरे, कांतीलाल झगडे, शकीलभाई सय्यद, बाळासाहेब हरणावळ, बाळासाहेब चितळकर, अमोल मुळे, रविराज भाळे यांची भाषणे झाली.