Murlidhar Mohol : SBI eDFS / SBI बँकिंग पोर्टलद्वारे पेमेंट करूनही आणि त्याचे अधिकृत व्यवहाराचे पुरावे (Transaction Proofs) संबंधित अधिकाऱ्यांना सादर करूनही पुण्यातील अनेक HPCL पेट्रोल पंप डीलर्सचे इंधन लोड रोखून ठेवण्यात आल्याबद्दल पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (PDAP) ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बँकिंग प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी किंवा अंतर्गत रेकन्सिलिएशनमुळे HPCL च्या खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसत नसल्यास, त्याची जबाबदारी डीलर्सवर टाकणे अन्यायकारक आहे. डीलर्सनी अधिकृत बँकिंग माध्यमातून पेमेंट केले असताना केवळ तांत्रिक कारणास्तव त्यांचा माल रोखणे अजिबात स्वीकारार्ह नाही. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात इंधनाची मागणी वाढलेली असताना अनेक पेट्रोल पंप ड्राय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे डीलर्ससोबतच सर्वसामान्य ग्राहकांचीही गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे म्हणाले “अधिकृत बँकिंग माध्यमातून पेमेंट करून त्याचे पडताळणीयोग्य पुरावे सादर केलेले असतानाही डीलर्सना इंधन नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. पेमेंट रेकन्सिलिएशनमधील तांत्रिक विलंबाची शिक्षा डीलर्सना का? HPCL ने अशा व्यवहारांची तातडीने पडताळणी करून लोड रिलीज करणे अपेक्षित आहे. विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या काळात डीलर्सना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे डीलर्समध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून, यावर तातडीने तोडगा निघणे आवश्यक आहे.”
या गंभीर प्रकरणाची असोसिएशनने HPCL चे चेअरमन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG) तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दाद मागितली असून, वैध SBI पेमेंट पुराव्यांच्या आधारे सर्व पात्र डीलर्सचे लोड तातडीने रिलीज करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रलंबित इंडेंट पूर्ण करण्यासाठी रविवारीही पुण्यातील डेपो सुरू ठेवावेत, जेणेकरून कोणताही पेट्रोल पंप ड्राय होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.
मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे मंचावरच निधन ; दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात काळाचा घाला-
अशा प्रकारच्या अनावश्यक पुरवठा व्यत्ययामुळे केवळ डीलर्सचे नुकसान होत नाही, तर HPCL च्या ब्रँड प्रतिमेलाही धक्का बसतो आणि ग्राहकांचा विश्वास कमी होतो. अंतर्गत पेमेंट रेकन्सिलिएशनच्या समस्येमुळे ग्राहकांना इंधनटंचाईचा सामना करावा लागू नये. पेमेंट केले असेल तर माल मिळालाच पाहिजे! तांत्रिक विलंबामुळे इंधनटंचाई निर्माण होणे अस्वीकार्य असल्याची प्रतिक्रिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेकडून देण्यात आली आहे.
