Download App

Maratha Reservation : “भरला सरकारच्या पापाचा घडा; अजितदादा बाहेर पडा” : बारामतीमधूनच वाढला दबाव

बारामती : “भरला सरकारच्या पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा”, अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून निघाले. मराठा समाजाला आरक्षण आणि जालना येथील लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज (4 सप्टेंबर) बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवार यांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. (Huge rally against Shinde government in Baramati on Maratha reservation issue)

अन्यथा दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु :

कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते भिगवण चौक असा सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. भिगवण चौकात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर, आगामी सर्व निवडणुकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल. एकही मराठा मतदार मतदान करणार नाही. पण वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु, असा इशारा देण्यात आला. तसंच आरक्षण मिळत नसेल तर अजितदादांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी आक्रमक मागणी करण्यात आली. दरम्यान, या घोषणांनंतर आता बारामतीमधूनच अजितदादांवर दबाव वाढला असल्याचे बोलले जात आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर गत आठवड्यात जोरदार लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जचा महाराष्ट्रभरातून निषेध करण्यात आला. तसंच अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनही करण्यात आली. यानंतर लाठीहल्ल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी एक तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ सोडावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बारामतीपूर्वी त्यांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीमधूनही अशी मागणी करण्यात आली असल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांमध्ये आल्या आहेत.

काटेवाडीच्या प्रश्नावर अजित पवार काय म्हणाले?

मात्र या बातम्यांनंतर आपण लगेचच गावच्या सरपंचांना फोन करुन माहिती घेतली, मात्र ती केवळ एका व्यक्तीची मागणी असल्याचे आपल्याला सांगण्यात आले, त्यामुळे त्याला एवढे महत्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले. आज राज्यातील मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्यावतीने एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारी मंत्री, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी काटेवाडीच्या प्रश्नाला उत्तर दिले.

काटेवाडीचा विषय का काढला, माझं गाव आहे म्हणूनच काढला ना? अखंड महाराष्ट्रात 40 हजार गावं आहेत, त्याचा कुठला विषय निघाला नाही. मी ताबडतोब सकाळी सरपंचाला फोन केला, म्हंटलं कोणी रे तिथं मागणी केली, तो म्हणाला, दादा आम्ही कोणीही तिथं नव्हतो. एक व्यक्ती त्याने तशी मागणी केली. आता एवढ्या मोठ्या राज्यात 14 कोटी जनतेपैकी एकाने ती मागणी केली. पण त्याला एवढा अधिकार नाही. तो कोण गावचा सरपंच नाही, उपसरपंच नाही किंवा कोणतरीही प्रमुख असता तर त्यावर काही तरी उत्तर दिलं असतं, असं म्हणत अजित पवार यांनी काटेवाडीच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

Tags

follow us