पुणे : देवाची आळंदी परिसरातील अनेक अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. या शिक्षण संस्थांबद्दल प्रशासनाकडे आणि राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संस्थांच्या तपासणीचे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निर्देशांनुसार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 20 समित्यांची स्थापना केली आहे. (Instructions to take action against several unauthorized Warkari educational institutions in Devachi Alandi area)
याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी देवाची, केळगाव, चऱ्होली खुर्द व चऱ्होली बुद्रुक, चोवासावाडी आणि डुडुळगाव या परिसरात काही बुवा मंडळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था चालवितात. या संस्थामध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत, अशा संस्थाना कोणत्याही विभागाची मान्यता नाही. या संस्थांच्या विद्यार्थी वसतिगृहात दाखल बालकांबरोबर अनैसर्गिक लैंगिक शोषण करून त्याचे आयुष्य उध्वस्त करण्यात येत आहे, अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली होती.
या तक्रारीनंतर चाकणकर यांनी शासकिय अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी (3 फेब्रुवारी) आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. तसेच महिला आणि बाल विकास विभाग, महसूल विभाग, गृहविभाग महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, आळंदी नगर पालिका यांची समिती गठीत करून आळंदीमध्ये चालवण्यात येणाऱ्या बालकांच्या संस्था/ वसतिगृहे यांची तपासणी करून दोन दिवसात आयोगास सादर करणेबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
यानुसार अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यानंतर चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत.
आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे. सर्व 20 समित्यांचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.