पुणे : औंध परिसरात राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने बुधवारी (दि. १५) आपल्या राहत्या घरात पत्नी व मुलाचा खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान, याप्रकरणाचा पाेलिसांनी तपास केला आहे. तपासानंतर मृत अभियंत्याच्या आत्महत्येचं गुढ उलगडलं आहे. खासगी व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने आयटी अभियंत्याने पत्नीसह आपल्या मुलाचा खून करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुश्रृंगी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रियंका सुदिप्ताे गांगुली (वय ४०), तनिष्क सुदिप्ताे गांगुली (८) असे खून झालेल्यांचे नाव असून सुदिप्ताे गांगुली (४४) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. सुदिप्ताे गांगुली हे मुळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून कामानिमित्त ते पुण्यात १८ वर्षापूर्वी स्थायिक झाले हाेते. औंध परिसरात ते भाडयाच्या घरात मागील तीन वर्षापासून राहत हाेते.
Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार
हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत काम करत असतानाच त्यांनी ऑनलाइन भाजी साॅफ्टवेअर व्यवसायाकरिता विकसित केले हाेते. त्यानंतर त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, त्याकरिता त्यांनी दाेन जणांकडून ३० लाख रुपये उधार घेतले हाेते. मागील आठ महिन्यांपासून त्यांनी टीसीएस कंपनीतून ब्रेक घेऊन व्यवसायावर लक्ष्य केंद्रित केले हाेते. मात्र, व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने तसेच उधारी वाढत गेल्याने मागील काही दिवसांपासून ते चिंतेत हाेते. त्यातूनच त्यांनी पत्नी व मुलाचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तवला आहे.
सदर घटनेमागे काेणतेही काैटुंबिक वाद नसल्याचे पाेलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्याची माहितीही चतुश्रृंगी पाेलिसांनी दिली आहे. दरम्यान, मृत सुदिप्ताे गांगुली यांचा भाऊ बेंगलुरूवरुन पुण्यात दाखल झाला असून या घटनेची अधिक माहिती पोलिसांकडून घेत आहे.