Kaiynaat Dara : महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांचा विवाह सोहळा आता निश्चित झालाय. आगामी 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे हा विवाह सोहळा राजेशाही थाटात संपन्न होणार आहे. मात्र, या विवाहाच्या पार्श्वभूमीवर समाजात काही धार्मिक शंका उपस्थित केल्या जात होत्या, तसेच वधू कायनात दारा (Kaiynaat Dara) यांच्या नावावरून व पार्श्वभूमीवरून काही गैरसमज पसरविले जात होते. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत माहिती देण्यात आलीय.
विवाहाबाबतच्या धार्मिक शंका आणि शंकराचार्यांचे मार्गदर्शन
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे किंवा वडिलांचे निधन झाल्यानंतर एक वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते. अन्यथा पुढील तीन वर्षे घरात लग्नकार्य करता येत नाही, अशी एक समज समाजात प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर, या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी थेट करवीर पीठाच्या पूज्य शंकराचाऱ्यांची भेट घेतली. करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने, या लग्नकार्यासंबंधित रूढी-परंपरांची वस्तुस्थिती समजून घेण्यात आली. यावेळी शंकरचाऱ्यांनी स्पष्ट केलं की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी आणि संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते; परंतु एका वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे यासंदर्भात कोणताही गैरसमज बाळगण्याचे अजिबात कारण नाही.
पोस्ट ऑफिस RD योजना: दरमहा 2,000 जमा करा आणि मिळवा 1 लाख 42 हजार
साखरपुडा आणि विवाहाची तारीख अधिकृतरीत्या जाहीर
शंकराचाऱ्यांच्या या मार्गदर्शनानंतर पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
साखरपुडा आगामी 29 जुलै 2026 रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईक आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. विवाह सोहळा 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे हा विवाह सोहळा संपन्न होईल.
RTI कार्यकर्ता, शोध पत्रकार ते CJP आंदोलनाचा चेहरा; कोण आहेत सौरभ दास?
वधू ‘कायनात दारा’ यांच्याविषयीची योग्य माहिती
मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही वृत्तमाध्यमांमध्ये पार्थ पवार यांच्या नियोजित वधूबाबत चुकीची, त्रुटीपूर्ण आणि दिशा भूलणारी माहिती प्रसारित होत होती. त्या काश्मिरी असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अधिकृत तपशील जाहीर केलाय. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असे असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्या काश्मिरी नसून पंजाबी हिंदू कुटुंबातील आहेत. त्यांचा समाज क्षत्रिय आणि गोत्र कश्यप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कायनात दारा यांनी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी’ येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जगातील अग्रगण्य अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE), लंडन येथून आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) विषयात प्रथम श्रेणी सन्मानासह बी.एस्सी. (B.Sc.) पदवी प्राप्त केलीय. व्यावसायिक अनुभवाचा विचार करता, त्यांनी नामवंत वृत्तवाहिनी ‘NDTV 24×7’ मध्ये रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळलीय. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत.
दरम्यान लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, पार्थ पवार यांच्या वैयक्तिक किंवा शैक्षणिक माहितीचा उल्लेख करताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच आधार मानावा, असे स्पष्ट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.
