Download App

Kasaba By Election नवा ट्विस्ट; शिवसेनेची निवडणुकीत एन्ट्री

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता (MLA Mukta Tilak) टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीतमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पुण्यात पार पडली असून या बैठकीत कसबा पोटनिवडणूक (Pune By Election) शिवसेनेने लढावीच, असा एकमुखी सुरू उमटला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत आणखीनच चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली काल (ता.29 जानेवारी ) रोजी रात्री एक बैठक पार पडली, या बैठकीत कसबा पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी आणि उमेदवारी शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांनी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांकडे केली आहे. हा निरोप घेऊन संपर्कप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याचे समजते.

दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणूक जर काँगेस लढण्याची मागणी करत असेल तर शिवसेनेने का लढवू नये, असा सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आवळला. त्यामुळे ही पोटनिवडणूक शिवसेना लढणारच,असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. कसबा पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केली असून काँग्रेसकडून इच्छुक असणारे रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज देखील केला आहे. त्यातच आता शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत कासब्याची जागा लढवण्याची तयारी दाखवल्याने या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे.

दरम्यान, या मतदारसंघातूनच शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे हे देखील इच्छुक आहेत. विशाल धनवडे यांनी २०१९ मध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना १३ हजार ९८९ इतकी मते मिळवली होती. ते पुन्हा एकदा या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी चिंचवड मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याचं गणित मांडत कसब्यातून नव्हे तर चिंचवडमधून शिवसेनेला उमेदवारी मिळावी, असे म्हटल्याने कसब्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यानंतर बैठक घेऊन पुण्यातील शिवसैनिकांनी कसब्यात निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा निरोप पक्षप्रमुखांना पाठवला आहे. यावर आता काय निर्णय होणार याकडे शिवसैनिकांचे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us