Download App

Kasba byelection नवा ट्विस्ट; ठाकरे गटाचे नेते नाराज शैलेश टिळकांच्या भेटीला

पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा (Kasba byelection) मतदारसंघात टिळक कुटुंबाऐवजी भाजपने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून ही उमेदवारी टिळक कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी केली जात होती. तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपने त्यांना डावलून रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावरून टिळकांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती.

त्यानंतर आता महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आहे. या भेटीने आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

शैलेश टिळक आज हेमंत रसाने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे टिळक नाराज असल्याचे चर्चा सुरु आहेत. अशात ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेली भेट हा कसबा पोटनिवडणूकीत नवा ट्विस्ट ठरू शकतो.

या भेटीनंतर संजय मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.’स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक या 2019 साली सेना-भाजप युतीत निवडून आल्या होत्या. आता मुक्ताताईंच्या निधनानंतर त्यांच्या घरात उमेदवारी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. पण शैलेश टिळक किंवा कुणाल यापैकी कोणालाच उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. म्हणून मैत्रीच्या नात्याने आम्ही त्यांना भेटायला आलो.’ असं संजय मोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, रासने यांच्या उमेदवारी नंतर कसब्यात भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने कसब्यात बॅनर लावण्यात आले असून या बॅनरच्या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.

Tags

follow us