पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार देण्याऐवजी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करून दाखवील.
महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले की उमेदवार कोणीही असला तरी यावेळी भाजपचा विक्रमी मतांनी विजय होणार आहे, भाजपचे कार्यकर्ते आणि पक्षसंघटना मजबूत आहे. त्याच्या जीवावर आम्ही ही निवडणूक जिंकू असं मत त्यांनी व्यक्त केलं.
भाजपकडून पोटनिवडणूक करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, पण महाविकास आघाडी निवडणुक लढवणार आहे. त्यावर बोलताना रासने म्हणाले की, “निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्न करत होती पण निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया आहे. भाजपने विनंती केली पण ती विनंती मान्य करायची की नाही, हा विरोधकांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुक लढवली तर निवडणुक होईल आणि भाजप ती निवडणुक जिंकेल.”