पुणे : कसबा मतदारसंघातील (kasba bypoll) काँग्रेस (Congress) पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना फोन करत पक्षासाठी त्याग करण्याचे केलेले आवाहन अन् त्यानंतर दाभेरकर यांनी मागे घेतलेला उमेदवारी अर्ज या साऱ्या घडामोडी घडल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे टेन्शन मिटले. कार्यकर्त्यांसाठी आपण हा अर्ज मागे घेतल्याचे दाभेकर सांगत आहेत. दिवसभरात घडलेल्या या घडामोडींवर ‘लेट्सअप’शी संवाद साधला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहुल गांधी यांनी तुम्हाला खरेच फोन केला का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल दाभेकर म्हणाले, की ‘मला राहुल गांधी यांचा थेट फोन आला होता. त्यावेळी गांधी म्हणाले आम्ही पक्षासाठी त्याग केला तसा तुम्ही यावेळेस त्याग करावा. भविष्यात नक्कीच तुमचा विचार केला जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे मी कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधींचा फोन आला नसता तर तुम्ही निवडणुकीत राहिला असता का, यावरही त्यांनी म्हटले की ‘मी सगळे कार्यकर्त्यांवर सोडले होते. कार्यकर्त्यांनीच मला निवडणुकीत उभे केले होते. जर पक्षाकडून अन्याय होत असेल तर निवडणुकीत का उभे राहू नये,’ असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी तुम्हाला केलेला फोन ही एक अफवा आहे, अशीही चर्चा आहे. यावर दाभेकर म्हणाले, की ‘मला राहुल गांधी यांचा फोन आला होता हे नक्की. बाकी ज्यांना जे काही समजायचे त्यांनी तसे समजावे.’ ‘आगामी काळातील नगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच हा निर्णय घेतला. राज्यात महाशिवरात्रीचा उत्सव मोठा असतो. त्यामुळे या उत्सवानंतर म्हणजेच 21 तारखेनंतर आपण निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ. शेवटच्या टप्प्यात प्रचारात सहभागी होणार आहे. कारण, आता मी उमेदवार नाही. जर असतो तर कदाचित लवकरही प्रचारात उतरलो असतो’ असे दाभेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
काँग्रेसचे पक्षाचे रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलणे झाले का किंवा ते तुम्हाला भेटले का या प्रश्नावर ते म्हणाले, की ‘मी आतापर्यंत त्यांना भेटलो नाही ते ही मला भेटले नाही. मी गेल्या ४० वर्षांपासून पक्षात आहे. धंगेकर तीन वर्षांपासून आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप होऊ नये यासाठी अद्याप भेट झालेली नाही. भविष्यात भेटू.’
कार्यकर्त्यांनी माघार घ्यायला लावले
‘मी निवडणुकीतून माघार घेतली नाही तर कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती. पक्षाकडून भविष्यात काहीतरी मिळेल असे आश्वासन होते. त्यामुळे माघार घेतली. मात्र, जर आगामी काळात आश्वासनाची पूर्तता केली गेली नाही तर २०२४ च्या निवडणुकीत आपण लढणार आहोत,’ हे सुद्धा दाभेकर यांनी आवर्जुन स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे नेते अद्याप प्रचारात सहभागी नाहीत. तसे ते प्रचारात लवकरच सहभागी होतील.