पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहिला.
भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार देण्याऐवजी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी दिली आहे.
काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की “शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे.”
जगताप कुटुंबीयांमध्ये देखील लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाऊ दोघेही इच्छुक होते. पण आज जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो” असंही ते यावेळी म्हणाले.