विष्णू सानप, (विशेष प्रतिनिधी)
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल लागणार आहे.
दरम्यान, कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत होत आहे. मात्र, चिंचवडमध्ये शिवसेना-ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि राहुल कलाटे अशी तिरंगी लढत बघायला मिळत आहे. त्यामुळे अटीतटीच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागल आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमधून निवडणूक लढवली होती. तर, त्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी लढवलेली ही निवडणूक महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग म्हणून ओळखली गेली. आणि त्यानंतर महाविकास आघाडी होऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. आता पुन्हा एकदा तसाच प्रयोग होताना दिसत असून हा प्रयोग अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि वंचित युतीचा बोलला जात आहे.
शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने कलाटे यांना थेट पाठिंबा देऊ शकत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेची वंचित सोबत युती आहे. मात्र, वंचितची महाविकास आघाडी सोबत युती नाही. एका बाजूला शिवसेनेचे नेते कलाटे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा धर्म शिवसेनेला पाळावा लागत आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी गोची झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल कलाटे यांनी वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. त्यांच्या या आवाहनाला वंचितने सकारात्मक प्रतिसाद देत कलाटेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबतच भाजपचेही टेन्शन वाढल आहे. अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यामध्ये जोरदार टक्कर होईल, असं बोललं जात आहे. मात्र, या दोघांमध्ये वंचितच्या पाठिंब्याने वजन वाढलेले कलाटे मताधिक्य मिळून विजय होऊ शकतात, असाही कयास अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. या झाल्या शक्यता. मात्र, येत्या दोन मार्चला निकाल स्पष्ट होईल.
दरम्यान, कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे. त्यात ऐन मोक्याच्या वेळी वंचितनेही महाविकास आघाडीवर कुरघोडी केल्याने आणखीनच चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग म्हणून कलाटेंनी दमदार कामगिरी करत एक लाख 12 हजार मते मिळवली होती. आता अप्रत्यक्षरीत्या शिवसेना आणि वंचितच्या युतीचे उमेदवार म्हणून सेना-वंचित युतीचा हा पहिला प्रयोग किती यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.-