पुणे – पुण्यात सध्या कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शनिवारी पुण्यात आले होते. येथे त्यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी व्यक्त केला.
निवडणुकीबाबत आणखी काय चर्चा झाली, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, की आम्ही जुने मित्र आहोत. विधानसभा आणि मंत्रिमंडळात आम्ही बरोबर काम केले आहे. आज मी त्यांना पुण्यात भेटायला आलो होतो. येथे त्यांच्याशी सदिच्छा भेट झाली. ते लवकरच बरे होतील आणि कामाला सुरुवात करतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत काही चर्चा झाली का असे विचारले असता ते म्हणाले, की या मुद्द्यावर मी त्यांच्याशी काही बोललो नाही. मी काही बोलण्याआधीच त्यांनी सांगितले, की काळज करू नका. पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आम्ही जिंकणार असे त्यांनी सांगितल्याचे शिंदे यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=1EnO7wM7AaI
दरम्यान, आजारपणामुळं भाजप खासदार गिरीश बापट काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari),राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले. कसबा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे बापट व शिंदे यांच्या भेटीबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे.