पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भारतीय जनता पार्टीचे (BJP) पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी आपण हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. आपली प्रकृती ठिक नाही, त्यामुळे आपल्याला प्रचारात सहभागी होता येणार नाही, असे पक्षाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माजी राज्यसभा खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे देखील पोटनिवडणुकीच्या प्रचारात गेल्या काही दिवसांपासून दिसत नाही. त्यामुळे बापट-काकडे नाराजीचा गुंता भाजप कसा सोडवणार आहे हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, आजारी गिरीश बापटही आज कसब्याच्या मैदानात उतरणार आहेत. संध्याकाळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहे. कसबा जिंकण्यात गिरीश बापटांची भूमिका महत्वाची असल्याने काल देवेंद्र फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे गिरीश बापट हे देखील आपल्या सुनेला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. तर गटनेता गणेश बिडकर, संघांचे स्वयंसेवक धीरज घाटे हे देखील उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. मात्र, प्रत्यक्षात पक्षाने टिळक-बापट कुटुंबाला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे टिळक-बापट कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्याने एकीकडे ब्राह्मण समाज तर धीरज घाटे यांनाही उमेदवारी न मिळाल्याने संघ स्वयंसेवक देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता कसबा पोटनिवडणुकीत संजय काकडे यांना महत्व न दिल्याने तेही या निवडणुकीपासून लांब असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कसबा मतदार संघ पोटनिवाणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी तब्ब्ल सात तास बैठक घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट आणि संजय काकडे यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत बापट-काकडे हे निवडणूक प्रचारात सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ते नाराजच राहिले तर भाजपला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
गिरीश बापट आणि संजय काकडे या दोघांची कसबा पेठ मतदार संघात मोठी ताकद आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. या दोघांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपला बसू शकतो म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गिरीश बापट हे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात सहभागी जरी झाले नाही तरी त्यांचा व्हिडीओ तयार करून तो मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या हालचाली देखील भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे.