Download App

Ravindra Dhangekar : सोन्या-चांदीचे कारागीर, संपत्ती दहा कोटींची!

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Bypoll) काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (दि. ६) रोजी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.

Tags

follow us