Pune Teachers Constituency : शिक्षकांना अनेक कामं लावली जातात, त्यामुळं त्यांची प्रतिष्ठा कमी झाली असं वाटतं का, यावर बोलताना कौस्तुभ गावडे म्हणाले, आजची परिस्थिती पाहिली तर शिक्षकांना (Pune) शैक्षणिक कामांवरून हिणवलं जातं, काही ठिकाणी शिक्षकांना मारहाण होते. जनगणना करताना दहा शिक्षकांचा मृत्यू झाला. हे सगळं पाहता शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा विषय गंभीर झाला आहे, असंही ते म्हणाले. ते लेट्सअप मराठीवर खास मुलाखतीत बोलत होते. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून कौस्तुभ गावडे मैदानात आहेत.
हजारो शिक्षक आज अतिरिक्त ठरत आहेत. प्राथमिक शाळांचं प्रमाण म्हणजेच सुमारे दहा हजार शाळा एकशिक्षकी आहेत, अशी वास्तव परिस्थितीही गावडे यांनी यावेळी मांडली. ज्यावेळी गुणवत्तेचा विषय येतो, तेव्हा वाटतं की गुणवत्ता ढासळत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कोयता गँग आहे. ज्या भागात शाळांचा मोठा अभाव आहे, अशाच भागात या गुन्हेगारी टोळ्या निर्माण होत आहेत, असं निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं.
पुणे शिक्षक निवडणूक आमच्यासाठी खूपच सोपी कारण, कौस्तूभ वडे स्पष्टच म्हणाले
शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा हा महाराष्ट्र आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, महर्षी रामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी महाराष्ट्र प्रेरित झालेला आहे. यांच्या विचारांवर चालत सर्व शिक्षकांना प्रतिष्ठा दिली पाहिजे, असंही ते म्हणाले. दरम्यान, ‘मी शिक्षक नाही’ हे म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आज माझ्या वयावरून काही टीका होत असेल, तर आपण इतिहास पाहिला पाहिजे. या महाराष्ट्राला युवकांनीच दिशा दाखवली आहे. याच मातीनं वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहिले, वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर पाहिले. याच मातीनं वयाच्या 32 व्या वर्षी स्वतःचे प्राण हिंदवी स्वराज्यासाठी अर्पण करणारे संभाजी महाराज पाहिले, असा दाखला देत त्यांनी वयाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे.
ज्या लोकांना शंका आहे, त्यांना सांगतो की, मी 2019 पासून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2021 पासून मी प्रशासकीय पातळीवरील कामातही सहभागी आहे. 12 जिल्ह्यांत ही संस्था चालते. माझे पणजोबा बापुजी साळुंखे यांनी ही संस्था स्थापन केली. ते शिक्षक होते. माझे आजोबा शिक्षक होते. आजी शिक्षक होती. आई, पत्नी, आत्या, मावशी, आम्ही सगळे शिक्षक आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर, माझ्यासारखा शिक्षकांच्या समस्या समजणारा दुसरा कुणी असेल, यावर मला शंका आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जुनी पेन्शन दोन टप्प्यांत विखुरलेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनेक शिक्षकांची यामध्ये मोठी हेळसांड होत आहे. आज महाराष्ट्रात सुमारे 26 हजार जण आहेत, ज्यांना या पेन्शनचा लाभ मिळाला नाही. तसंच, आज अनेक शिक्षक, ज्यांनी फक्त शिकवण्याचंच काम केलं आहे, त्यांनी दुसरा कुठलाही व्यवसाय केला नाही. किंबहुना, अनेकांना वेगळं काही करता येतही नाही, असंही ते म्हणाले आहेत.
यावेळी टीएटी परीक्षेवरही त्यांनी भाष्य केलं. आपण या सर्व विषयाचा अभ्यास केला, तर त्या काळातले नियम पाहून त्यांना नोकरी देण्यात आली. त्यावेळी त्यांची जी गुणवत्ता ठरवली, त्याच चौकटीत त्यांना नोकरी दिली आहे. परंतु, आज 15 ते 20 वर्षांनी त्यांनी आजपर्यंत शिकवलेलं बाजूला सारून त्यांना अशी परीक्षा द्यायला लावत असाल, तर ते चुकीचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, शिक्षकांनाच का ही परीक्षा, असा प्रश्न उपस्थित करत अधिकारी, न्यायाधीश यांनाही अशी परीक्षा द्यायला लावावी आणि त्यात ते उत्तीर्ण झाले नाहीत, तर त्यांनाही खुर्च्या खाली करायला लावा. फक्त एका परीक्षेमुळं शिक्षकांना जर बाजूला करणार असाल, तर आम्ही यावर आक्रमक लढा उभा करू, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
