Download App

गुढीपाडवा विशेष : साखरगाठी कशी तयार होते पाहा…

पुणे : गुढीपाडवा (GUDI PADWA) म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीला आवर्जून बांधल्या जाणाऱ्या गाठींना या दिवशी विशेष महत्त्व असते. साखरेपासून तयार केली जाणारी ही साखरगाठी (SAKHAR GATH) गुढीला बांधण्याबरोबरच घरातील लहान मुलांच्या गळ्यात घालण्याचीही पद्धत आहे. पुण्यात (Pune) भवानी पेठ येथे गणेश डिंबळे यांच्या कारखान्यात सध्या साखर गाठ बनवण्याची लगबग सुरू आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसदर वाढीचा फटका व्यवसायाला बसला आहे.

गणेश डिंबळे यांचा व्यवसाय हा संक्रांतीचे तिळगुळ आणि साखरगाठी तयार करण्याचा आहे. हा व्यवसाय त्यांच्या वडिलोपार्जित आहे. दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर साखरगाठी बनवली जाते. या तयार साखरगाठी पुण्यातील सर्वच देवस्थान तसेच मंदिरांमध्ये जात असते. कोल्हापूर आणि इतर मोठमोठ्या देवस्थानात देखील या साखरगाठीला मागणी असल्याचे गणेश डिंबळे यांनी सांगितले.

साखरगाठी कशी बनवतात?
एक सागवानी लाकडाचे साचे असते. त्या साच्यामध्ये विविध प्रकारच्या नक्षीकाम कोरलेले असते. त्यात दोरा लावून तयार केलेला साखरेचा पाक ओतला जातो आणि दहा ते बारा मिनिटांनी हे साचे थंड झाले की नक्षीदार पांढरी शुभ्र अशी साखरगाठी तयार होते. ही पद्धत सोपी असली तरी साखरगाठी तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. कारखान्यात काम करणारे कामगार आपल्या राज्यात कमी असल्याने बाहेरील राज्यातील कामगार बोलवावे लागतात, अस गणेश डिंबाळे यांचे म्हणणं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे दर तसेच वाढत असलेले गॅसचे दर यामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. साखरगाठी मागे 20 रुपचे एवढी वाढ यंदा झाली आहे. ही वाढ जरी होलसेलमध्ये झाली असली, तरी रिटेलमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेले दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने याचे सावट सणांवर देखील होते. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद होते. आता मात्र पुन्हा या व्यवसायात तेजी आली आहे. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Tags

follow us