पुणे : माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे. चंद्रकांत टिंगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा प्रचार करत होते. त्यावेळी हा हल्ला झाल्याचे समजत आहे. काल (दि.18) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता पुण्यातदेखील माजी नगसेविकेच्या पतीवर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर टिंगरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तावडेंना भाजप नेत्यांनीच पकडून दिलं, त्यांच्यावर गृहखात्याकडून पाळत; संजय राऊतांचा गंभीर आरोप…
६ दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत वडगाव शेरीतीलील माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे (Rekha Tingre), सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा टिंगरे आणि खडकवासला मतदारसंघात बालाजी नगर येथील भाजप नेते समीर दिलीपराव धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार साहेब (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता.
रेखा टिंगरे वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र शरद पवार आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे हात बळकट करण्यासाठी आता त्यांनी पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असल्याचं सांगितलं जातंय.
रेखा टिंगरे यांनी २०२२ मध्ये भाजपात प्रवेश केला होता, परंतु चार महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र ६ दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. त्यानंतर मतदानाच्या एकदिवस आधी त्यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेमका हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बापूसाहेब पठारे यांच्याकडून निषेध, कारवाईची मागणी
बापूसाहेब पठारे म्हणाले,’निवडणूक मतदानाला काही तास उरले असताना महत्वाच्या नेत्यावर,कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत.ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल’.