कोट्यवधींची BMW, मर्सिडीज अन्.. पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार निवडणुकीच्या निकालापूर्वीच चर्चेत

PMC Election आता पुणे महापालिकेच्या निवडणुकांचं वारं आहे. मग, चौकाचौकात वाफाळलेला चहा पितांना चर्चा रंगणार नाही असं शक्यच नाही.

  • Written By: Published:
कोट्यवधींची BMW, मर्सिडीज अन्.. पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार निवडणुकीच्या निकालापूर्वीच चर्चेत

PMC Election Richest Candidate Assets : पुण्यात जे-जे काही घडतं त्याची चर्चा राज्य-देश एवढेच काय तर, परदेशातही अगदी जोरदार होते. त्यात आता पुणे महापालिकेच्या निवडणुकांचं वारं आहे. मग, चौकाचौकात वाफाळलेला चहा पितांना चर्चा रंगणार नाही असं शक्यच नाही. अशीच एक चर्चा सध्या शहरभर सुरू आहे. विषय उमेदवारी मिळण्याचा आहेच पण, त्याही पुढे शहरातील सर्वात श्रीमंत उमेदवार नेमका कोण? याची. त्याचबद्दल जाणून घेऊया…

Dhiraj Ghate Exclusive : पुण्यात भाजप किती जागा जिंकणार? धीरज घाटेंनी आकडाचं सांगितला

महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नाही असे भाजपनं जाहीर केलं. मात्र, स्वताच घेतलेल्या निर्णयाला भाजपातील नेत्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. भाजपनं राज्यमंत्री, खासदार-आमदारांच्या कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली आहे. यात भाजपने दिवंगत खासदार आणि मंत्री गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे, मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, विनायक निम्हण यांचे चिरंजीव चंद्रशेखर निम्हण, माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, पालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे वडगाव शेरीचे विद्यामान आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून बाजी मारली आहे.

आंदेकर कुटुंबाला राजकारणात कोणी पोसले ? कलमाडी ते अजितदादा…

 सर्वात श्रीमंत उमेदवार किती कोटींचा मालक?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून बाजी मारणाऱ्या सुरेंद्र पठारे यांच्याकडे थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 271 कोटी 85 लाखांची मालमत्ता आहे. पठारे यांच्याकडे फक्त कोट्यवधींची संपत्ती आहे का? तर, जरा थांबा सुरेंद्र यांच्या ताफ्यात कोट्यवधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यांसारख्या महागड्या आणि स्टायलिश वाहनांचा समावेश आहे. वाहनांची ही संख्या पालिकेच्या निवडणुकीसाठी इतर माजी आमदार, खासदारांच्या नातेवाईकांच्या तुलनेत अधिक असल्याचीही चर्चा आहे.

पुण्यातील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत फक्त सुरेंद्र पठारे हे एकमेव आहेत का? तर, नाही पठारे यांच्या पाठोपाठ श्रीमंतीच्या दुसऱ्या क्रमांकावर नंबर लागतोय तो, खडकवासला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांचा. सोनरी आमदार अशी ओळख असलेले दिवगंत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्येकडे तब्बल 77 कोटी 65 लाख रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती दाखल प्रतिज्ञापत्रांतून समोर आली आहे.

वांजळे यांच्या पाठोपाठ माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव असलेल्या पृथ्वीराज सुतार यांच्या ताफ्यात निसान मायक्रा, इनोव्हा, बुलेट अशा गांड्यांचा समावेश असून, त्यांची एकूण मालमत्ता 42 कोटी 51 लाख रूपयांची असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. त्यांनी अभियांत्रिकी शाखेची पदविका घेतली आहे.

सुतार यानंतर ज्या उमेदवाराचा नंबर लागतो तो आहे औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या चंदरशेखर निम्हण यांचा. निम्हण यांच्याकडे 36 कोटी रूपयांची मालमत्ता असून, ताफ्यात एक इनोव्हा, पाच स्प्लेंडर प्लस दुचाकी तसेच एका बुलेटचा समावेश आहे. सध्या त्यांच्याकडे 25 तोळे सोने असल्याचेही निम्हण यांनी दाखल प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. यापूर्वी म्हणजेच 2017 साली त्यांनी निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी 17 कोटी 76 लाख एवढी मालमत्ता दाखवली होती. ऑस्ट्रेलिया येथून त्यांनी बांधकाम व्यवस्थापन विषयाची  पदवी घेतली आहे.

तर, प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांचे शिक्षण एलएलएमपर्यंत झाले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढत आहेत. त्यांनी 12 वर्षापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक देखील त्यांनी लढविली आहे. त्यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता 11 कोटी 22 लाख रुपयांची असून त्यांच्याकडे एक दुचाकी, आणि 23 लाखांची क्रेटा गाडी आहे. याशिवाय स्वरदा बापट यांच्याकडे 13 तोळे सोने आहे. त्यांनी 87 लाखांचे विनातारण कर्ज देखील घेतलेले आहे. तर, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्याकडे 45 लाख रुपये किंमतीची बीएमडब्ल्यू गाडी असून एक दुचाकी देखील आहे.

भाजप समर्थकांचा संताप अन् पूजा मोरे यांची निवडणुकीतून माघार; ‘विकेट’ नेमकी कशी पडली?

कोट्यवधींची मालमत्ता असलेले पठारे, सायली वांजळे किंवा अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावणार आहेत. आता मतदार कोट्यवधींची मालमत्ता असेल्या या सर्व उमेदवारांना किती मतांनी निवडून आणतात ते 16 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीतूनच समोर येईल. पण, त्याआधीचं उमेदवारांनी जाहीर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीची सध्या शहरभर जोरदार चर्चा रंगली आहे.

follow us