उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सव; सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Sunny Nimhan- क्रीडा, कला, आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

  • Written By: Published:
Sunny Nihaman

पुणे: युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Nimhan) यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, ”माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ‘सुपर सनी मंथ’ (Super Sunny Month) मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. क्रीडा, कला, आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे. आजच्या तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. ‘सुपर सनी मंथ’च्या माध्यमातून प्रत्येक युवकाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी आणि आपल्या परिसरातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, हीच माझी मनापासून इच्छा असल्याचे नगरसेवक सनी निम्हण यांनी म्हटलंय.

या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले आहे. या माध्यमातून गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन आठ मार्च रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी प्रकारात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहाटे पाच वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये दहा हजारांहून अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी 5,50,000 रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी 5 मार्चपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.

जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील मुले आणि मुलीसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा बुधवारी 18 फेब्रुवारी आणि गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणार्या या स्पर्धेत एकूण 60 हजार रुपयांची बक्षिसे, प्रशस्तिपत्रक आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघास रुपये 1000 आणि हरणाऱ्या संघास रुपये 500 रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ८०० कराटेपडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलीसाठी या स्पर्धा 1 मार्च रोजी सुस रोड येथील सनी वर्ल्ड येथे होणार आहेत. या स्पर्धा 6, 8, 10, 12, 14 वर्षांखालील आणि 14 वर्षावरील मुले व मुलीसाठी होतील. स्पर्धेत एकूण 1 लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक आणि पदके चषक देण्यात येणार आहेत.

सोमेश्वर चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा 9, 11, 13, 15, 17 वर्षे वयोगटात मुले आणि मुलींच्या गटात, तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहे. स्पर्धेत एकूण 50 हजार रोख पारितोषिकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.


जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा

कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. ही स्पर्धा रुक्मिणी हॉल या ठिकाणी 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी रंगणार आहे. सुशील गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण 60 हजार रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार असल्याचे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भरत देसडला यांनी सांगितले.


जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धा

जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 200 हुन अधिक अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे.
ही स्पर्धा 21 व 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी होणार आहे. ब्रिजमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही या स्पर्धा होत आहे. 85 हजार रोख पारितोषिकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.


जिल्हास्तरीय टेनिस स्पर्धा

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली जिल्हास्तरीय 12 व 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 150 हून अधिक खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा 21 व 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी सुस रोड येथील सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.


एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली सोमेश्वर करंडक खुल्या व विविध वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी 1 मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. ही बुद्धिबळ स्पर्धा 7,10,12 व 15 वर्षांखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण एक लाख रुपये रोख पारितोषिकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

follow us