Download App

“..तर मनसेही तिसऱ्या आघाडीत असेल”; राजू शेट्टींचं सूचक वक्तव्य

तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.

Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास  (Maharashtra Elections) आघाडीला टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी आकार घेत आहे. या आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आघाडीत कोण सहभागी होणार? या आघाडीचं नाव काय असणार? आगामी निवडणुकीसाठी काय रणनीती असणार या महत्वाच्या मुद्द्यांवर आज पुण्यातील बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीआधी संभाव्य तिसऱ्या आघाडीतील नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते. तिसऱ्या आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारित असेल. या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू असे राजू शेट्टी म्हणाले.

कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; राजू शेट्टी आक्रमक

राजू शेट्टी पुढे म्हणाले, शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याच ठरवलं. एक सक्षम पर्याय म्हणून तिसरी आघाडी असेल. हा आमचा केवळ प्रयत्न आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कामगारांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडवले नाहीत. प्रस्थापितांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी आहे.

सध्या राज्याची संस्कृती रसातळाला गेली आहे. युती आणि आघाडीत टोळी युद्धासारखं राजकारण सुरू आहे. राज्यातील हेच चित्र बदलण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आगामी निवडणुकीत राज ठाकरेंनी एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिली किंवा तसे काही संकेत दिले तर मनसेला तिसऱ्या आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी आम्ही सकारात्मक विचार करू असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना तिसऱ्या आघाडीत घेणार का असा प्रश्न विचारला असता राजू शेट्टी म्हणाले, आमची आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारीत आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापला अजेंडा मागे ठेवावा लागणार आहे. सगळ्यांना सामावून घेण्याची आमची तयारी असणार आहे.

बच्चू कडू येणार होते त्यांना काही उशीर झाला आहे. आघाडीचं नाव काय असावं? आघाडी कशी असेल यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्याच्या वातावरणाला पर्याय देऊ शकतो म्हणून आघाडी करायची आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना नागरिक कंटाळले आहेत. आजच्या बैठकीत आमची दिशा स्पष्ट होईल. आमच्या सोबत शेतकरी चळवळीतील नेते आहेत, अशी माहिती स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

Kolhapur : महायुतीतून आम्हाला मोकळं करा; युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचं धनंजय महाडिकांना आवाहन

follow us