Vasant More : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) राजकीयदृष्ट्या मोकळे झाले आहेत. आता त्यांच्या डोळ्यांसमोर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आहे. कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढणारच हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं आहे. आता प्रश्न फक्त तिकीटाचा आणि पक्षाचा राहिला आहे. वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार, कोणता पक्ष त्यांना लोकसभेचं तिकीट देणार अशा चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहेत.
या चर्चांचं उत्तर देण्याचा प्रयत्न वसंत मोरे यांनी केला आहे. वसंत मोरे यांनी आज मुंबईत दैनिक सामना कार्यालयात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.
वसंत मोरे म्हणाले, मला पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे. यावर मी ठाम आहे. यासाठी मी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहे. संजय राऊत शरद पवार यांची भेट मी घेतली ते सुद्धा सकारात्मक आहेत. पुण्याची जागा काँग्रेसकडे जरी असली तरी त्या ठिकाणच्या नेत्यांशी माझा समन्वय आहे त्यांच्या मी संपर्कात आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुद्धा माझे या विषयावर बोलणे झाले आहे आणि ते सुद्धा माझ्या भूमिकेला साथ देतील असा विश्वास वाटतो. आता महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षात प्रवेश करायचा यावर दोन दिवसांत निर्णय घेईल. मी सध्या कोणत्या पक्षात जाणार यासंदर्भात बोलणार नाही सर्वांशी चर्चा झाल्यानंतर भेटीगाठी झाल्यानंतर मी निर्णय घेईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले.
वसंत मोरे पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार? चर्चा तर तशाच होताहेत…
मविआ’चं गणित मोरेंच्या पथ्यावर
पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Pune Lok Sabha Election) काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांनी नुकतीच पोटनिवडणूक लढवली आहे. आता पुन्हा त्यांना लोकसभेचे तिकीट आणि त्यानंतर परत आमदारकी लढवायची झाल्यास त्यांना अवघड जाईल हे लक्षात घेता दुसऱ्या उमेदवाराची महाविकास आघाडीकडून चाचपणी होऊ शकते. वसंत मोरे यांची पुणे शहरात मोठी लोकप्रियता आहे. एक आक्रमक चेहरा म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांना पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला आघाडीकडे दुसरा तगडा उमेदवार नाही. अशा परिस्थितीत वसंत मोरे यांचा विचार होऊ शकतो.