Sharad Pawar on Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) वक्तव्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी उडाली. जरांगे पाटील राजकीय भाषा वापरत असून त्यांचे बोलविते धनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे हेच (Uddhav Thackeray) आहेत. त्यांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला होता. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यासंदर्भात एसआयटी चौकशीची घोषणा केली.
या दरम्यान, भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी एक मोठा दावा केला होता. शरद पवार गट जरांगे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी यासाठी पवार गट प्रयत्न करील. ती जागा शरद पवार गटाला मिळाल्यानंतर जरांगे यांना तिथून उमेदवारी दिली जाईल, असे देशमुख म्हणाले होते.
‘ते’ अजूनही पोरकट, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याची शरद पवारांनी उडवली खिल्ली
भाजपकडून केल्या जात असलेल्या या आरोप आणि दाव्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलं की मनोज जरांगे पाटील यांना बीडमधून उमेदवारी देणार का? त्यावर शरद पवार यांनी एवढी आमच्यावर वेळ आलीय का? असं उत्तर दिलं. त्याचवेळी हा दावा कुणी केला असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. त्यावर पत्रकारांनी आशिष देशमुख यांचं नाव घेतलं. ‘मर्यादीत मेंदूचा माणूस’ अशा शब्दांत पवारांनी त्यांची खिल्ली उडवली. ज्यांचा मेंदू मर्यादीत आहे त्यांच्याबद्दल जास्त काय बोलणार, असेही पवार म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली होती. गोंधळ जास्त वाढत असल्याचे पाहून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले होते.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं चिघळलं? आंदोलनात दगड आणि जेसीबी कुठून आले? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.