Sharad Pawar : ‘इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद’; शरद पवारांनीच केलं शिक्कामोर्तब
Sharad Pawar Statement on INDIA Alliance : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election) विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकापाठोपाठ (INDIA Alliance) एक धक्के बसत आहेत. आधी ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी साथ सोडली. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवालही धक्का देण्याच्या तयारीत आहेत. समाजवादी पार्टीचेही तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यांच्याकडून आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणाच होणे आता बाकी राहिले आहे. या धक्क्यांमुळे इंडिया आघाडी गलितगात्र झालेली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. इंडिया आघाडीत अनेक ठिकाणी वादविवाद सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
शरद पवार आज कोल्हापुरात आहेत. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी एकत्रित काम करावं असं वाटतं. परंतु, यातील काही पक्ष त्या त्या राज्यांपुरते मर्यादीत आहेत. अशा ठिकाणी राज्यातील आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्याबाबत आता चर्चा सुरू आहे.
Sharad Pawar : भावनिक आवाहनाची गरज नाही, लोक आम्हाला.. शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर
काही ठिकाणी वादविवादही सुरू आहेत. हे वाद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी एकत्र काम करतोय. उत्तर प्रदेशात जागावाटपात एकवाक्यता नाही. पश्चिम बंगालमध्येही वेगळी परिस्थिती नाही. बंगालमध्ये अडचणी जास्त आहेत. येथे आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात आहेत. हे प्रश्न आम्ही अद्याप हाताळलेले नाहीत. अशा वाद असणाऱ्या ठिकाणी आघाडीतील नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
आमदार गेले, चिंतेची बाब नाही
महाराष्ट्रातील जागावाटपाबाबतही त्यांनी भाष्य केलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जागावाटपाच्या बैठकांना उपस्थित असतात. मी नाही. काही आमदार आम्हाला सोडून गेले यात चिंता करण्यासारखं काहीही नाही. आगामी काळात राज्यभरात दौरे सुरू करणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील तीन जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झालेला नाही. उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपात गेल्याचे आश्चर्य मला वाटत नाही. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख सरकारच्या श्वेतपत्रिकेत आला तेव्हाच अंदाज आला होता की अशोक चव्हाण वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांच्या मनात शंका; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न सुटला तर..