Supria Sule Politics : सुप्रिया सुळे नाव घेतलं की, नेहमी अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडणार चेहरा असेच चित्र उभं ठाकतं. पण नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पानिपत पाहण्यास मिळालं. त्याला अनेक कारणदेखील आहेत. या पराभवाचं खापरं नंतर फुटेल त्याच्यावर फुटेल पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्या असणाऱ्या सुप्रिया सुळेंनी ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या त्या बघता आता त्यांनी राजकारण सोडावं का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
मुद्दे कळीचे पण ठाम भूमिका नाही
सुप्रिया सुळे राज्यातील असो किंवा देशातील अनेक कळीच्या मुद्द्यांवर लोकशाही आहे येथे सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित करत त्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना दिसतात. त्यांच्या प्रश्नांवर चर्चादेखील घडते पण, त्या प्रश्न विचारून ते तोडीस नेत नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न आहे तसेच राहतात. अनेकवेळा त्यांचे मुद्दे जरी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असतात पण, अनेकदा त्या लोकशाही लोकशाही करत पण उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सुळे यांचीच भूमिका ही ठाम नसल्याचे दिसून येते.
दोन्ही पक्ष एकत्र झाले पण, प्रचारात गायब
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची युती झाली. पण, ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत सुप्रिया सुळेंचा चेहरा दिसलाच नाही. एवढचं काय तर, जाहीरनामा प्रकाशनावेळी फक्त अजितदादाच त्यांची भूमिका मांडताना दिसले. एवढेच काय तर, माळेगावच्या निवडणूक प्रचारातही सुप्रिया सुळे दिसल्या नाहीत. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्याच प्रचारातून गायब झाल्या तर पक्ष संघटना मजबूत कशी होणार असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित झाला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरदेखी जागांच्या वाटाघाटीवेळी सुप्रिया सुळे यांचा सहभाग हवा तसा दिसून आला नाही.
पक्षातील नेत्यांना पाठिंब्याऐवजी खडबोल
पुणे महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांचे विश्वासू नेते प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ऐन रणधुमाळीत जगतापांनी पक्षाची साथ सोडल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. जगताप यांच्या राजीानाम्यावर सुळे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. जगताप नाराज आहेत का? यावर त्यांचे मन वळवण्याऐवजी सुप्रिया यांनी जगताप यांनाच खडेबोल सुनावल्याचे पाहण्यास मिळाले.
त्या म्हणाल्या की, नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीत मान्य नाही, अशी नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाराजी चालत नाही. जगताप यांचे प्रश्न रास्त आहे, सगळ्या कार्याकर्त्याचे मत महत्वाचे आहे. ही निवडणूक आहे, असे म्हणत जगताप यांच्या भावनांना आणि त्यांच्या भूमिकेला सुप्रिया यांनी थेट केराची टोपलीच दाखवली. तर, दुसरीकडे आमचा पक्ष म्हणजे घर असल्याचेही त्या वारंवार सांगताना दिसतात मग, जगताप यांच्या राजीनाम्यावेळी वरिष्ठ म्हणून त्यांनी जगताप यांचे मन वळवण्याचा प्रयत्न त्यांनी का केला नाही असेही अनेकाच्या मनात आले.
एवढेच काय तर, राजीनामा देण्यापूर्वी प्रशांत जगताप यांनी दोन दिवस मुंबई येथे जाऊन पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांची चर्चा केली होती. तब्बल 6 तास त्यांच्याशी चर्चा करून देखील प्रशांत जगताप यांनी आपला निर्णय बदलला नसल्याचे पाहायला मिळाल. राजीनाम्याबाबत पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना माझ्या शुभेच्छा आणि “रोज नई सुभह होती है”. असे एका वाक्यामध्ये उत्तर दिलं होतं. त्यामुळे जगताप पक्षात नकोसे झाले होते का? असा प्रश्न सुळेंच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या मनात आला.
एकूणचं काय तर, सुप्रिया सुळे या सत्ताधाऱ्यांना लोकशाहीत सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे सांगत घाम फोडताना दिसतात मात्र, उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्द्यांवरच त्यांची भूमिका ठाम दिसून येत नाही तसेच पक्षातील नेत्यांचं मनही त्या वळवण्यात यशस्वी होऊ शकल्या नाही त्यामुळे अशा नेत्याच्या छत्रछायेखाली काम करण्यापेक्षा त्यांनी राजकारण सोडून द्यावं असे दबक्या आवाजात आता बोललं जाऊ लागलं आहे.
