Unseasonal Rain : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका पुणे (Rain in Pune) शहरालाही बसला. पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन तापमानात घट झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्याने जाणारे नागरिक आणि वाहनचालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील सिंहगड रोड, टिळक रोड आणि लोहगाव, वडगाव धायरी, रामटेकडी, वैदूवाडी, मुंढवा, केशवनगर, खराडी आणि घोरपडी परिसरासह अन्य भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच रस्त्यात पाणी साचले. तसेही पाऊस होईल याचा अंदाज होताच. सकाळपासूनच वातावरण ढगाळ दिसत होते. गार हवाही सुरू होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. बराच वेळ पाऊस सुरू होता.
या पावसामुळे शहरात अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तळजई भागात गारपीट झाल्याचीही माहिती आहे.
राज्यात कालपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याला या पावासाने झोडपून अन्य जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडला. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडले तर शेतात गारांचा खच पडला होता. हजारो रुपये खर्च करून वाढवलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जमीनदोस्त झाली. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा, गहू, हरभरा अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अयोध्येतल्या महाराष्ट्र भवनाला ‘बाळासाहेबांचं’ नाव, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
राज्यात शुक्रवारपासून बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. मागील महिन्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. त्यावेळी देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
नगरला झोडपले
नगर शहरासह जिल्ह्यात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. आधीच शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले असून मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत जमा झाले. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाहनचालकांचेही चांगलेच हाल झाले. पावसाबरोबरच गाराही पडत होत्या. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रविवारी दुपारपर्यंत काही भागात वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांना शनिवारची रात्र अंधारातच काढावी लागली.