‘त्या’ एका उडीनं हवाच बदलली! पुण्याच्या स्पा जगताचा हा ‘काळा’ चेहरा पाहून तुम्हीही हादरून जाल
आता पोलिसांच्या या कठोर कारवाईच्या कार्यपद्धतीवरच उलट-सुलट प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
वर्षाभरापूर्वी पुण्यातील गल्लीबोळांत आणि मुख्य चौकांत झगमगाटी (Pune) ‘स्पा’ सेंटर्सचे बोर्ड दिसायचे. पण आज चित्र बदललंय. एकेकाळी जिथे आरामाची स्वप्नं विकली जायची, तिथे आज पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमतोय. पोलिसांच्या वाढत्या धाडींमुळे अनेक स्पा मालक पसार झालेत, तर काहींनी चक्क खिडकीतून उड्या मारून पळ काढण्याची वेळ आलीय. नक्की काय घडतंय पुण्यात? पाहूयात या काळ्या धंद्याचा हा संपूर्ण पंचनामा…
पुण्यातील अवैध स्पा व्यवसायासाठी 2025 ते 2026 हे वर्ष अक्षरशः ‘काळ’ ठरलंय. विमाननगर, कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर यांसारख्या हायप्रोफाईल भागांत पुणे पोलिसांनी (विशेषतः गुन्हे शाखेने) एकापाठोपाठ एक 100 हून अधिक धाडी टाकून स्पा माफियांचे कंबरडे मोडले. या कारवाईत फक्त स्थानिकच नाही, तर थायलंडसह इतर देशांतून तस्करी करून आणलेल्या तरुणींची या विळख्यातून सुटका करण्यात आली. तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे अड्डे अधिकृत मसाज पार्लरच्या नावाखाली चालवले जात होते, पण पडद्यामागे ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’च्या कोडवर्डखाली देहविक्रयाचा बाजार भरवला जात असे.
केवळ वेश्याव्यवसायच नाही, तर काही स्पा सेंटर्समध्ये ड्रग्ज पार्ट्या आणि अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याचं समोर आलंय. कोरेगाव पार्कसारख्या भागात जिथे ड्रग्जचा शिरकाव झाला, तिथे पोलिसांनी कायमची टाळेबंदी केली आहे. सराईत गुन्हेगारांचे वर्चस्व पाहता, पोलीस आयुक्तांनी थेट ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारलाय. यामध्ये काही बड्या धेंडांचे आणि राजकीय वरदहस्त असलेल्यांची नावं समोर आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. थोडक्यात सांगायचं तर, पुण्यातल्या ‘स्पा’ संस्कृतीच्या नावाखाली चालणारा हा अनैतिक कारभार आता शेवटच्या घटका मोजतोय, एवढं मात्र नक्की.
3 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! ‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित
या धाडसत्रादरम्यान नुकतीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना विमाननगरमध्ये घडली. येथील ‘द रुट्स स्पा’वर पोलिसांनी छापा टाकताच अटकेच्या भीतीने महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट उडी मारली. या भीषण अपघातात संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून व्यवस्थापक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे ‘अनैतिक मानवी व्यापार’ सुरू असल्याच्या पक्क्या तक्रारीनंतरच ही कारवाई करण्यात आली होती; मात्र कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी या दोघांनी मृत्यूला कवटाळण्याचं टोकाचं पाऊल उचललं, ज्यामध्ये एका महिलेला नाहक आपला जीव गमवावा लागला.
स्पा मधील महिलेने पोलिसांना पाहून उडी मारल्याच्या या घटनेनंतर, आता पोलिसांच्या या कठोर कारवाईच्या कार्यपद्धतीवरच उलट-सुलट प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. खरं तर, याआधी पुण्यात बेधडक सुरू असलेल्या स्पा सेंटर्सवर कारवाई होत नव्हती, तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ही कारवाई न होण्यामागे मोठ्या ‘अर्थकारणाचे’ आणि वरदहस्ताचे गंभीर आरोपही सातत्याने होत होते. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला सक्त आदेश आणि उगारलेला बडगा यामुळे आता हे अवैध स्पा धडाधड बंद होऊ लागले आहेत. या आक्रमक भूमिकेमुळे स्पा माफियांचे धाबे दणाणले आहेत, हे मात्र नक्की.
याच धाडसत्रातून सुटका करून घेण्यासाठी संबंधित महिलेने खिडकीतून उडी मारली आणि आपला जीव गमावला. या घटनेने एक गंभीर प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. अटकेच्या भीतीने किंवा कायद्याच्या दहशतीमुळे अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालणं खरंच गरजेचं होतं का? एका बाजूला कायद्याचा धाक निर्माण होत असताना, दुसरीकडे अशा दुर्दैवी घटनांमुळे या कारवाईच्या भीषणतेवरही चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारांना पकडताना अशा जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांचा विचार कसा करायचा, हा आता पोलिसांसमोरही एक नवीन पेच ठरत आहे.
दरम्यान पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. संबंधित ‘स्पा’मध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून, व्यवस्थापक व मालकाविरोधात ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार’ (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात स्पाच्या नावाखाली सुरू असलेला हा मृत्यूचा आणि वासनेचा खेळ आता पोलिसांच्या कडक कारवाईमुळे उघड झाला असून, येणाऱ्या काळात अशा अनेक अड्ड्यांचे धाबे दणाणले आहेत.
